Breaking News

एमडी, एमएस प्रवेशाला मुदतवाढ देण्याची मागणी


पुणे, एमडी, एमएस या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी पहिली सुधारित गुणवत्ता यादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. यातील विद्यार्थ्यांना मात्र दि. 27 ते 29 ए प्रिल या कालावधीत प्रवेश घेण्यास मुदत देण्यात आली. दरम्यान, शनिवारपासून बँकांना सलग चार दिवस सुट्टी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना लाखो रुपयांचे शुल्क कसे भरायचे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रवेशासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे.राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी पहिली यादी जाहीर केली. 

व्यवस्थापन कोट्याच्या पाचपट शुल्कवाढीसाठी राज्यातील सात खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यापूर्वी प्रकाशित केलेल्या पहिल्या प्रवेशाच्या यादीतील विद्यार्थ्यांना एमडी, एमएस पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना सामान्य कोट्यातील दोनशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले होते. मात्र, आता कॉलेजांनी व्यवस्थापन कोट्यासाठी चारपट शुल्क आकारण्याला सहमती दर्शविल्याने पुन्हा प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. त्यानुसार सीईटी सेलने प्रवेशाची सुधारित यादी गुरुवारी दुपारी प्रकाशित केली. यामध्ये प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांसोबतच सर्वांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती सीईटी सेलच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.