Breaking News

तारांगणाचे 1 मे रोजी शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन


पुणे, सहकारनगर येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये पुणे महापालिकेच्या वतीने साकारण्यात आलेल्या अत्याधुनिक थ्री डी व्हिज्युलायझेशन डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित स्व. विलासरावजी देशमूख थ्रीडी तारांगणाचे उद्घाटन 1 मे रोजी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम दुपारी 1.30 वाजता होणार आहे. 

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, शिवाजीराव निलंगेकर पाटील, सुशिलकुमार शिंदे, नारायण राणे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह आमदार अमित देशमूख, अभिनेता रितेश देशमूख, माजी मंत्री दिलीप देशमूख आणि वैशाली विलासराव देशमूख उपस्थित राहणार आहेत. हे तारांगण संपूर्ण वातानुकूलित आहे. तारांगणाचा डोम व्यास सुमारे 9.50 मीटर असून तो एफआरपीमध्ये तयार करण्यात आला आहे. 15 अंशात पुढील बाजूस डोम बसविल्याने प्रेक्षकांना प्रत्यक्ष खगोल विश्‍वात असल्याची अनुभूती मिळणार आहे. अवकाशातील रचना आणि घडामोडी यांचे प्रभावी दर्शन घडविण्यासाठी या तारांगणात अत्याधुनिक 4 के रेझ्युलेशनचे 3 व्हिज्युलायझेशन डिजिटल तंत्रज्ञानाचा आणि 10.1 क्षमतेच्या ध्वनी यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे, अशी माहिती नगरसेवक आबा बागूल यांनी दिली.