Breaking News

चितपट कुस्त्यांनी निमगाव वाघाची यात्रा उत्साहात

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील ग्रामदैवत श्रीबिरोबा महाराजांची यात्रा उत्साहात पार पडली. यात्रेच्या दुसर्‍या दिवशी भरविण्यात आलेल्या कुस्त्यांचा आखाडा चितपट कुस्त्यांनी गाजला. एकशे एक रुपयापासून तर एकवीस हजार रुपया पर्यंन्त लावण्यात आलेल्या मल्लांच्या कुस्तीचा थरार रंगला होता. या निकाली कुस्त्यांनी ग्रामस्थांच्या डोळ्याचे पारणे फिटले. तर हगाम्यात जिल्ह्यातील अनेक नामवंत मल्लांनी सहभाग नोंदवला.


कुस्ती हगाम्याच्या प्रारंभी आखाड्याचे पूजन करुन करण्यात आले. यावेळी नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, पो.कॉ. राजेंद्र डोंगरे, अनिल डोंगरे, पै.कादरभाई शेख, नामदेव भुसारे, शंकर गायकवाड, भरत फलके, पै.वसंत फलके, गोरख फलके गुरुजी, अरुण कापसे, बाबा जाधव, मच्छिंद्र काळे, पीएसआय छगन कापसे, पै.बबन शेळके, पै.संजय कापसे, पै.भानुदास ठोकळ, पै.विकास निकम, पोपट शिंदे, टिलूनाना पवार, मयुर काळे, भानुदास कापसे, अरुण फलके, भाऊसाहेब ठाणगे, पै.बाळू भापकर आदि उपस्थित होते.
यात्रा उत्सवानिमित्त गावात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेच्या पहिल्या दिवशी गावातील युवकांनी प्रवरा संगम येथून आनलेल्या गंगाजलच्या कावड्यांची मिरवणुक मोठ्या उत्साहात डफ, ढोल, ताशे व लेझीम पथकासह काढण्यात आली. श्रीबिरोबा महाराजांच्या मुर्तीस गंगाजलाने अभिषेक घालून विधीवत पूजा झाली. सालाबाद प्रमाणे यात्रोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने जिल्ह्यातील भाविक दर्शनासाठी हजर होते. रात्री छबीना मिरवणुक काढण्यात आली. फटाक्यांच्या आतषबाजी आसमंत उजळून निघाला होता. यात्रेच्या दुसर्‍या दिवशी झालेल्या कुस्ती आखाड्यात उत्तम कुस्ती करणार्‍या मल्लांवर ग्रामस्थांनी रोख बक्षिसांचा वर्षाव केला. तसेच पराजित होणार्‍या मल्लांना देखील प्रोत्साहनपर बक्षिस देण्यात आली. कुस्ती आखाड्याला महाराष्ट्र केसरी अशोक शिर्के, पै.मिलिंद जपे आदिंसह नामवंत मल्लांनी हजेरी लावून भरविलेल्या नियोजनबध्द आखाड्याचे कौतुक केले. यात्रेनिमित्त गावातील बिरोबा मंदिराला रंगरंगोटी करुन, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.