Breaking News

आमिर खान यांना पद्मविभूषणाने गौरव करण्याची राष्ट्रीय जनाग्रहाद्वारे मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त हुतात्मा स्मारक येथे पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन, शेतकर्‍यांच्या सर्वांगीन विकासासाठी जलसंधारण चळवळीला व्यापक स्वरुप देणारे सिने अभिनेते आमिर खान यांना पद्मविभूषण देवून गौरविण्याची राष्ट्रीय जनआग्रहाद्वारे मागणी करण्यात आली. यावेळी अ‍ॅड.कारभारी गवळी, जालिंदर बोरुडे, अशोक भोसले, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, सुनिल भोसले, अंबिका नागुल, हिराबाई ग्यानप्पा, सरुबाई काटकर, सुमन जोमदे, कौशल्या दिवटे, शकुंतला जकनाईक आदि उपस्थित होते.


महात्मा फुले यांनी तत्कालीन परिस्थितीत शेतकर्‍यांसाठी मोठे योगदान दिले. सिने अभिनेते यांनी सत्यमेव जयते वॉटरकपच्या माध्यमातून गाव पाणीदार होण्यासाठी जलसंधारणाच्या कामाला व्यापक स्वरुप दिले आहे. या योजनेचा फायदा अनेक गावांना होवून, अनेक गाव दुष्काळमुक्त होणार आहे. तसेच शेतकर्‍यांचा फायदा होवून त्यांच्या आत्महत्या थांबणार आहे. आमिर खान यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत शासनाने त्यांना पद्मविभूषणाने गौरव करण्याची यावेळी राष्ट्रीय जनाग्रहाद्वारे मागणी करण्यात आली.
अ‍ॅड.कारभारी गवळी म्हणाले की, देशातील शेतकरी निसर्गावर अवलंबून आहे. जलसिंचनाची सुविधा संपूर्ण देशासाठी शंभर टक्के यशस्वी करणे शक्य नाही. मात्र जलसंधारणाच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या पिकांना मोठ्या प्रामाणात जलसिंचनाखाली आनता येणार आहे. यामुळे देशातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवता येणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व पोपट पवार यांनी जलसंधारण कार्याची दखल संपुर्ण देशाने घेतली आहे. महाराष्ट्र शासनाने राबवलेली जलयुक्त शिवार योजनेला चांगले यश आले आहे. ही योजना देशातील संपूर्ण अवर्षण प्रवण क्षेत्रात राबवण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेवून बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांनी सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा महाराष्ट्रातील गावागावातून तुफान आलया या घोषवाक्यच्या माध्यमातून सुरु केली असून, याद्वारे अक्षरश: क्रांती घडत असल्याचे सांगितले. जालिंदर बोरुडे यांनी महात्मा फुलेंनी शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी व्यापक प्रयत्न केले. त्यांच्या जयंती दिनी शेतकर्‍यांसाठी कार्य करणार्‍या व्यक्तीचा गौरव करण्याची मागणी करण्यात आली आहे. आमिर खान यांच्या पुढाकाराने शेकडो गावे श्रमदानातून जलसंधारणाची कामे करीत आहेत. यामुळे बराच भाग दुष्काळमुक्त होण्यास मदत होवून, शेतकर्‍यांना चांगले दिवस येणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली.