Breaking News

डिजिटल बोर्डने घेतले दोन बळी? जामखेड नव्हे बिहार : राजकीय, सामाजिक, कार्यकर्त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

जामखेड / श. प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा पदाधिकारी योगेश राळेभात व राकेश राळेभात यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्याची घटना घडल्याप्रकरणी जामखेड पोलिसांत कृष्णा राळेभात यांच्या फिर्यादीवरून गोविंद गायकवाड सह अज्ञात सहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. डिजीटल बोर्ड वरून हे हत्याकांड घडविण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या हत्याकांडांमुळे उमद्या कार्यकर्त्यांना आपला जीव गमवावा लागल्याने या घटनेचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. 

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कृष्णा आंबादास राळेभात रा. मोरेवस्ती जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या वर्षीच्या उल्हास माने यांच्या तालमितील मुलांबरोबर राजकीय बोर्ड लावल्याचा राग मनात धरून भांडण झाले होते. याच कारणावरून दि. 28 रोजी सायं 6.30 वा जामखेड शहरातील बीड रोडवरील मार्केट यार्ड समोरील काळे यांच्या हॉटेलवर राकेश राळेभात आणि योगेश राळेभात हे चहा घेत आसताना गोविंद गायकवाड (रा. तेलंगशी ता. जामखेड) व 4-5 लोक त्याच्याबरोबर मोटारसायकलवरून येवून योगेश राळेभातवर गोळ्या झाडल्या, राकेश राळेभात मदतीसाठी धावला असता त्याच्यावरही गोळ्या झाडल्या. यामध्ये दोघेही ठार झाले आहेत. कृष्णा राळेभात यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गोविंद गायकवाड व इतर 4-5 जणांवर खूनाचा व आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालपासून मृतांच्या कुटुंबीयांसह शहरात शोकाकुल वातावरण आहे. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट दिली. दरम्यान पोलीस उपाधिक्षक सोनाली कदम, अप्पर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार, डिवायएसपी सुदर्शन मुंडे, श्रीरामपूर पोलीस उपाधिक्षक शिवतारे फौजफाटयासह जामखेडच्या घटनेवर नजर ठेवून आहेत. शहरात 300 पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरोपींच्या अटकेसाठी चार पथक रवाना झाले आहेत 

डॉ. लामतुरेंचे निलंबन?
ग्रामीण रुग्णालयात नेहमीप्रमाणेच अतिदक्षता विभागात कोणीही डॉक्टर उपलब्ध झाले नाही. याबाबत जिल्हाबाह्य संपर्क अधिकारी डॉ. आशिष कोकरे व प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. युवराज खराडे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांचेकडे डॉ. लामतुरेंच्या निलंबनाबाबत अहवाल पाठविला आहे.