Breaking News

मोदी सरकारच्या काळात लोकशाही धोक्यात : मनमोहन सिंग

नवी दिल्ली - देशातील न्यायव्यवस्थेच्या पतनाकडे लक्ष वेधत मोदी सरकारच्या काळात संवैधानिक संस्था धोक्यात असल्याचे मत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले आहे. ते आज काँग्रेसच्या रामलिला मैदानावरील जन आक्रोश रॅलीत बोलत होते.


ते म्हणाले की, सध्याच्या सरकारच्या काळात संवैधानिक संस्था धोक्यात आहेत. हे लोकशाहीसाठी चांगले नाही. आपण काँग्रेस पक्षाला आणि राहुल गांधी यांच्या अभियानाला पाठिंबा देत लोकशाही मजबूत केली पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. यावेळी मनमोहन सिंग यांनी विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्‍वास ठरावाची मुस्कटदाबी केल्याबद्दल पंतप्रधान मोदी सरकारवर सडकून टीका केली. लोकशाही ही संविधानाने दिलेली भेट असून त्याच्या संरक्षणासाठी आपण एकत्रित काम करायला हवे, असेही आवाहन सिंग यांनी यावेळी केले.
मोदी सरकारने निवडणुकीच्या वेळी दिेलेली आश्‍वासने पाळली नसल्याचेही मनमोहन सिंग यांनी आवर्जून नमुद केले. ते म्हणाले की, हे सरकार शेतकरी विरोधी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव कमी झालेले असताना देखील सरकार पेट्रोल डिझेलचे भाव कमी करत नसून त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात एकत्र येऊन देशातील सद्यस्थिती बदलवण्याची नितांत गरज आहे. यावेळी रॅलीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, वर्तमान अध्यक्ष राहुल गांधी, ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि इतर अनेक नेते उपस्थित होते.