Breaking News

स्वामी नरेंद्र महाराज यांच्या प्रवचन व दर्शन सोहळ्याची नेवासे नगरीत जय्यत तयारी


नेवासा ( शहर प्रतिनिधी )- श्री स्वामी नरेंद्राचार्य यांच्या सोमवार दि.16 एप्रिल रोजी होणार्‍या प्रवचन व दर्शन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज जिल्हा सेवा समितीच्या संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली. प्रवचन व दर्शन सोहळ्याप्रसंगी नेवासा येथील इजतेमा मैदानावर भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली असून संतपीठ उभारण्यात आले आहे. संतपीठावरच प्रवचनासाठी 10 बाय 20 या आकाराच्या स्क्रिन पडद्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महाप्रसाद, साहित्य प्रकाशन, साधक दीक्षा, सामाजिक उपक्रम, रक्तदान नोंदणी, देहदान नोंदणी कक्षाची उभारणी देखील मंडपाजवळच करण्यात आली आहे. सोमवार दि.16 एप्रिल रोजी होणार्‍या प्रवचन व दर्शन सोहळयाप्रसंगी संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिरापासून सकाळी 9 वाजता मिरवणूक काढण्यात येणार असून या मिरवणुकीत नरेंद्र महाराजांची प्रतिमा व पादुकांचा समावेश रहाणार आहे. मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावरून कार्यस्थळावर जाईल व तेथे समारोप होईल . त्यानंतर गुरुपादुका पूजन, श्रीलीला अमृत ग्रंथाचे पारायण, आरती सोहळा, स्वामी नरेंद्राचार्याचे प्रवचन व त्यानंतर महाप्रसाद व साधक दीक्षेचा सोहळा होईल. नगर जिल्हयासह इतर जिल्ह्यातील भाविकांनी दर्शन व प्रवचन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.