Breaking News

सर्वसामान्यांच्या खिशाला आजपासून कात्री

मुंबई : 2018 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आयकर स्लॅबमध्ये कुठलीही नवीन वाढ किंवा सूट दिलेली नसली तरी 1 एप्रिलपासून सुरू होणाऱया नव्या आर्थिक वर्षात अनेक बदल होणार आहेत. गृहोपयोगी अनेक वस्तूंचे दर वाढणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्य खिशाला कात्री बसणार आहे. सर्व प्रकारच्या उत्पदनावरील प्राप्तीकरावर 1 टक्का अतिरिक्त उपकर (सेस) नव्या आर्थिक वर्षापासून भरावा लागणार आहे. त्याशिवाय अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेले अनेक नवीन करप्रस्ताव रविवारपासून लागू होतील. त्यात शेअर विक्रीवरील दीर्घकालीन भांडवली नफा कर, तीनऐवजी चार टक्के आरोग्य आणि शिक्षण ‘सेस’, ज्येष्ठ नागरिकांना 50 हजारांपर्यंत व्याजावर आयकरात सूट यांचा प्रामुख्याने समावेश आहे. याशिवाय बहुचर्चित ई-वे बिल प्रणाली लागू होत आहे. 250 कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असणाऱया व्यावसायिकांवर कॉर्पोरेट करात कपात करून 30 ऐवजी 25 टक्के करण्यात आली आहे. एनडीए सरकारच्या शेवटच्या संपूर्ण अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कररचनेत फारसा बदल केला नव्हता, पण अतिश्रीमंतांवर 10 -15 टक्के सरचार्ज कायम ठेवतानाच इतर सर्व प्रकारच्या करयोग्य उत्पन्नावरील आरोग्य आणि शिक्षण उपकर लागू केला. पूर्वी तीन टक्के असणारा हा उपकर आता चार टक्के होईल.