Breaking News

कुंभारनामा - हातच्या कंकणाला आरसा कशाला

संजय गातेंचा कुटील डाव हा विशेष लेख मा. अशोक सोनवणे साहेब,संपादक लोकमंथन यांनी लि हिलेला आहे. हा लेख अतिशय वाचनीय, चिंतनीय व समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. आपल्या समाज बंधुभगिनीनी हा लेख आवर्जून वाचलाच पाहिजे असे मला वाटते. आजपर्यंतचा भारतीय इतिहास अभ्यासला तर असे दिसून येते की,बहुजन समाजातील वेगवेगळ्या जातीतील लोकांना एकमेकांत भांडणे लाऊन सत्तेचा उपभोग घेणारी जमात निर्माण झाली आहे. समाजात तेढ निर्माण करणे आणि भांडणे लाऊन मजा बघत बसणे, सत्तेचा उपभोग घेणे हा राजकारण करणार्‍या नेते मंडळींचा धंदा झालेला आहे. मा.संजय गाते या कुंभार समाजातील व्यक्तिच्या माध्यमातून इंदू मिलमधील गोरोबा काकांचे मंदिर व 25हजार चौरस फूट जागा समाजासाठी मागणी क रणे हे पूर्णतः चुकीचे आहे. कारण एकदा इंदु मिलची जागा डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकासाठी दिलेली असतांना नव्याने प्रश्‍न उपस्थित करण्याचे कोणतेही कारण नाही.मुळात अशी मागणी करणे चुकीचे आहे. यात राजकारण्यांचा कुटील डाव आहे.हे जाणण्याइतपत आपण दुधखुळे नाही आहोत.ज्या पुरोगामी महाराष्ट्रात आपण राहतो त्या महाराष्ट्राला शोभणारे नाही. संजय गाते हे भाजपाचे नेते आहेत. त्यांच्या मागणीमागे भाजपाचे राजकारण दडले आहे.
या मागणीमुळे कुंभार समाजामध्ये उभी फूट पडणार आहे. त्यांची ही मागणी समाजाने सोडून देणे हे समाज हिताचे आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पाईक असणारा बहुजन समाज व कुंभार समाज यांच्यात मतभेदाचे विष पेरुन ही राजकारणी मंडळी आपली पोळी भाजून घेतील. या धगीत आपला कुंभार समाज होरपळून निघेल व उध्वस्त होईल.
आज एस.सी,एस.टी,एन.टी, ओबीसी व इतर धर्मिय,मराठा शीख,ख्रिश्‍चन,लिंगायत हे लोक डॉ. बाबासाहेबांच्या विचारधारेखाली आहेत. ही संख्या जवळजवळ 65 ते 70 टक्केच्या
घरात आहे.या सर्वांशी गुण्यागोविंदाचे सबंध असतांना वैरत्व का पत्करावे? आज हा समाज आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. जे विष पेरणारे,अत्यल्प असणारे लोक आपल्या पाठीशी ठामपणे राहूच शकणार नाहीत. ही इतिहासाची साक्ष आहे. डॉ.बाबासाहेबांनी कुंभार समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करुन आपल्यावर अनंत उपकार केलेले आहेत. हे समाजाला चांगले माहित आहे. त्यामुळे डा ॅ. बाबासाहेबांच्याबद्दल आपला समाज कोणा एकासाठी बेईमान होणार नाही. बहुजन समाजाला झुजवायला लावणारे लोक कधीही लढ्यात,चळवळीत उतरलेले नाहीत.दलित व कुंभार समाज हा वाद झाला तर आपला समाज रसातळाला जाईल. हे सुज्ञ लोक जाणून आहेत. डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकाला विरोध करणे म्हणजे दुसर्‍याच्या मांडवात अक्षता आपल्यावर टाकून घेणे होय.दलित व कुं भार वाद झाला तर आमची मुले तरुंगात जातील.गुन्हेगार म्हणून त्यांचे जीवन उध्वस्त होईल.म्हणून सर्व समाज बांधवानी या मागणीला कडकडून विरोध केला पाहिजे.

समाजबंधू
श्री चंद्रकांत कुंभार 
कार्याध्यक्ष
कोल्हापूर जिल्हा कुंभार समाज
विकास फौंडेशन शाखा गडहिंग्लज.