Breaking News

६५४ ग्रामपंचायतींसाठी २७ मे रोजी मतदान; ४,७७१ रिक्तपदांसाठीही मतदान


राज्यातील विविध 25 जिल्ह्यांमधील 654 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 33 जिल्ह्यांतील सुमारे 2हजार 812 ग्रामपंचायतींमधील 4 हजार 771 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 मे 2018 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.

आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, यात सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे. ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांसाठी 7 ते 12 मे 2018 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जातील. त्यांची छाननी 14 मे 2018 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 16 मे 2018 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल. मतदान 27 मे 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 28 मे 2018 रोजी होईल.