सलमानला जोधपूर . कोर्टाचा दिलासा.
नवी दिल्ली : काळवीट शिकारप्रकरणी सध्या जामीनावर सुटलेला अभिनेता सलमान खान याला मंगळवारी जोधपूर न्यायालयाने दिलासा दिला. चित्रीकरणानिमित्त परदेश दौऱ्यावर जाण्यास परवानगी देण्याची त्याची विनंती न्यायालयाने मंजूर केली. हम साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जोधपूरमध्ये दोन काळविटांची शिकार केल्याप्रकरणी जोधपूर ग्रामीण मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सलमानला पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. दोन दिवस जोधपूर मध्यवर्ती कारागृहात काढल्यानंतर ७ एप्रिल रोजी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने त्याची या प्रकरणी जामीनावर मुक्तता केली. जामीन मंजूर करतानाच त्याला देशाबाहेर जाण्यास न्यायालयाने मज्जाव केला होता. देशाबाहेर जायचे असल्यास न्यायालयाची आगाऊ परवानगी घेण्याची अट न्यायालयाने घातली होती. त्यानुसार सलमान खान याने रीतसर परवानगीसाठी अर्ज केल्याने न्यायालयाने त्याला परदेशी जाण्याची परवानगी दिली.