बाजार ७ महिन्यांच्या उच्चांकावर बंद
तिमाहीची सकारात्मक आकडेवारी आणि हवामान विभागाने व्यक्त केलेल्या चांगल्या मान्सूनच्या अंदाजामुळे भारतीय शेअर बाजारात सलग ९ व्या दिवशी तेजी नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ०.२६ टक्के म्हणजेच ८९.६३ अंकांच्या वाढीसह ३४,३९५.०६ या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सचा २६ फेब्रुवारीनंतरची ही उच्चांकी पातळी आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातही निफ्टीदेखील ०.१९ टक्के म्हणजे २०.३५ अंकांच्या वाढीसह २७ फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच १०,५४८.७० या पातळीवर बंद झाला. हवामान विभागाच्या वतीने सोमवारी जारी करण्यात आलेल्या हवामानाच्या अंदाजात सलग चौथ्या वर्षी मान्सून सामान्य राहणार असल्याचे म्हटले आहे.