Breaking News

पोलिस अधिक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी उपस्थितांची सरसकट चालू असलेली धरपकड त्वरीत थांबविण्याची मागणी


अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी आ.संग्राम जगताप यांना पोलिस अधिक्षक कार्यालयात आनले असता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचा मोठा जमाव जमून काही समाजकंटकांनी कार्यालयाची तोडफोड केली. अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी. मात्र तेथे उपस्थितांची सरसकट चालू असलेली धरपकड त्वरीत थांबविण्याची मागणी अरुणोदय क्रांती सेवा संघाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार महेंद्र पाखरे यांना देण्यात आले. यावेळी अध्यक्ष अरुण खिची, सॅमसन केदारी, संदीप घोंगडे, केतन खिची आदि उपस्थित होते.

केडगाव येथे शनिवार दि.7 एप्रिल रोजी दुहेरी हत्याकांडनंतर आ.संग्राम जगताप यांना पोलीसांनी ताब्यात घेतल्याची बातमी शहरात पसरल्याने, रात्री पोलीस अधीक्षक कार्यालयात राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांचा मोठा जमाव जमला होता. काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या दरवाजाच्या काचा फोडून आत प्रवेश केला. पोलिसांना धक्काबुक्की करून आमदारांना उचलून बाहेर आनले. हा प्रकार अशोभनीय व पोलिसांच्या प्रतिष्ठेला कलंक लावणारा आहे. ज्यांनी हा प्रकार केला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे योग्य आहे. पोलिस अधिक्षकांनी भा.द.वि 1860 कलम 353,143, 147, 148, 149, 152,427, 323, 504 सह सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदा 3 व 7 सार्वजनिक मालमत्ता नुसार प्रतिबंध कायदा 3 प्रमाणे गु.र.नं.118/2018 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सीसीटीव्ही फुटेज वरून सर्व उपस्थितांची धरपकड केली जात आहे. घडलेला गैरप्रकार क्षमापात्र नाही. मात्र सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ज्यांनी तोडफोड केली त्यांच्यावरच कारवाई होणे अपेक्षित आहे. उपस्थित असलेल्या सरसकट सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांवर कारवाई केली जात आहे. या कारवाईद्वारे नागरिकांचे मुलभुत हक्क व मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ नये याची काळजी बाळगून योग्य कलमे लावून कारवाई केली जावी. हे प्रकरण ठराविक व्यक्तींकडून घडले असून, सर्वांना आरोपींच्या पिंजर्‍यात उभे करणे हे अन्यायकारक असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. ज्यांनी हा प्रकार केला अशा गुन्हेगारांचा शोध घेवून पोलिसांनी योग्य कारवाई करावी. मात्र या प्रकरणात पोलिसांच्या रोषाचा अनेक निरपराध व्यक्तींना त्रास सहन करावा लागत असून, उपस्थित सर्वांची होणारी धरपकड थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.