Breaking News

वाढत्या तापमानामुळे पाटपाण्यावर पडताहेत ‘उड्या’!


राहुरी तापमानाने चाळीशी घातल्याने तळपत्या उन्हामुळे कासावीस झालेल्या तरुणाईची पावले आपोआपच मनसोक्त पोहण्याकडे वळत आहेत. तालुक्यात सध्या पाटाला पाणी आलेले आहे. त्यामुळे यालाच ‘स्विंमिंग टॅंक’ मानत पोहण्यासाठी अनेकांच्या पाटात उड्या पडत आहेत.
मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यातून सध्या शेतीला उन्हाळी आवर्तने सुरू आहेत. कालव्याच्या पोटाचाऱ्यादेखील सुरू आहेत. एप्रिल महिन्याचा या आठवड्यात सूर्याने चांगलेच डोळे वटारल्याने हौशी तरुण सध्या पाटावर भरदुपारी पाण्यात डुंबण्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत. नगर-कोपरगाव रस्त्यावर जोगेश्वरी आखाडा येथील डावा कालवा हे जणू हौशी पोहणार्या मंडळींचे जलपर्यटनचे ठिकाण झाले आहे. शिर्डी, शनिशिंगणापूरला जाणारे भाविकदेखील या परिसरात विहार तसेच भोजनाचा आनंद घेत आहेत. तालुक्यातील काही हौशी मंडळी धोका पत्करून मुळा धरण परिसरात पोहण्यासाठी जातात. कृषी विद्यापिठ परिसरात पोहण्यासाठी स्विमिंग टँक उपलब्ध आहे. मात्र वेळ, पैसा, नियंत्रण अशा बंधनामुळे हौशी मंडळींची पावले आपोआपच नदी, पोटचार्याकडे वळत आहेत. सध्या मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यातून पाणी सुरु आहे. त्यामुळे तरुणाई या परिसरात मोठ्या संख्येने दिसून येत आहे.