Breaking News

टोलनाका तोडफोडप्रकरणी शिवसैनिकांविरुद्ध गुन्हे दाखल


तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गाच्या हिवरगाव येथील टोलनाक्यावर दि. २३ रोजी केलेल्या तोडफोडप्रकरणी शिवसेनेचे तालुका प्रमुख जनार्दन आहेर यांच्यासह २० शिवसैनिकांविरुद्ध टोलनाका गुन्हे दाखल करण्यात आले. व्यवस्थापक संजय तुकाराम लोणे यांनी याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, खा. सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली तालुका प्रमुख जनार्दन आहेर, शहर प्रमुख अमर कतारी आदींसह उत्तर नगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी हिवरगाव येथील टोलनाका प्रशासनाविरोधात विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले होते. नाशिकच्या धर्तीवर एमएच १७ पासिंगची सर्व वाहने टोलमुक्त करा, शेतमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांना संपूर्ण टोल मुक्त करा, टोल नाक्यावर स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्या, भुयारी मार्ग, गटारी व सर्व्हिस रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करा, रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पुलाची निर्मिती करा अशा विविध मागण्यांसाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. यावेळी आंदोलनातील संतप्त शिवसैनिकांनी टोलनाका बूथ क्रमांक २ च्या काचा फोडल्या होत्या.