Breaking News

2788 पैकी 1369 उमेदवारांचीच सुनावणीला हजेरी


 अहमदनगर । प्रतिनिधी । 24 -  ग्रामपंचायत निवडणूक लढविली, पण वेळेत खर्च सादर केला नाही. खर्च दाखल न करणार्‍या 2788 उमेदवारांना बजावलेल्या नोटिसांवर सुनावणी झाली. सुनावणीला जिल्ह्यातील 1 हजार 369 उमेदवारांनी हजेरी लावली असून दीड हजार उमेदवारांनी दांडी मारली आहे, त्यांच्यावरील कारवाईच्या हालचाली प्रशासकीय स्तरावर सुरू आहेत. गावोगावचे राजकारण यामुळे पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.
जिल्ह्यातील 749 ग्रामपंचायतींच्या निवडणुका ऑगस्टमध्ये पार पडल्या. निवडणुकीचा खर्च सादर करण्याची एक महिन्याची मुदत होती. मात्र निवडणुका झाल्या आणि विजयी व पराभूत उमेदवारांनी निवडणुकीची प्रक्रिया अर्धवट सोडून दिली. निवडणुकीचा खर्चही दिलेल्या मुदतीत सादर केला नाही. खर्च सादर न करणार्‍या उमेदवारांची संख्या 2 हजार 788 आहे. त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्यावर गेल्या तीन दिवस जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावण्या सुरू होत्या. सुनावणीच्यावेळी 12 तालुक्यातील 1 हजार 369 उमेदवारांनी हजेरी लावत म्हणणे सादर केले. पण, 1 हजार 419 उमेदवार सुनावणीलाही हजर राहिले नव्हते. सुनावणीस दांडी मारणार्यांना पुन्हा नोटिसा बजावण्यात येणार असून, आपल्यावर कारवाई का करू नये, अशा आशयाच्या त्या नोटिसा आहेत. निवडणूक लढविणार्या उमेदवारांवर खर्च सादर करणे बंधनकारक आहे. त्यासाठी त्यांना महिनाभराची मुदत होती. परंतु खर्च सादर न करता काहींनी पदभार स्वीकारला. पद कायम ठेवण्यासाठी आम्ही वेळेत खर्च सादर केला होता. त्याची सरकार दप्तरी नोंद का झाली नाही, असा सवाल काहींनी सुनावणी दरम्यान उपस्थित केला. 
काहींनी तर आम्हाला याबाबत काहीच माहिती नव्हती. पुढच्यावेळी अशी चूक होणार नाही, माफ करा,अशी विनंती यावेळी उमेदवारांनी केली. शासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, उमेदवारांना सहा वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याची कार्यवाही प्रशासनाकडून सुरू  करण्यात आली आहे. खर्च सादर न करणार्या उमेदवारांना पदावर पाणी सोडावे लागेल, अशी शक्यता प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.