Breaking News

दखल - वर्दीतला माज

वर्दीची एक शिस्त असते. एकदा वर्दी अंगावर घातली, की ती शिस्त पाळावी लागते. वर्दीला बट्टा लागणार नाही, असं तिचं वर्तन असायला हवं. वर्दीचा धाक गुन्हेगारांना असायला हवा, सामान्यांना नको. वर्दीचे काही नियम असतात. एखाद्या पोलिस अधिकार्‍याला त्याच्या पोलिस ठाण्याची हद्द ओलांडून दुसरीकडं जायचं असेल, तर त्यानं आपल्या पोलिस ठाण्याच्या हालचाल रजिस्टरमध्ये नोंद करायची असते. तसंच अन्य पोलिस ठाण्यालाही कळवायचं असतं. वर्दीतल्या माणसालाही काही व्यसनं असू शकतात. खरं ती असायला नको; परंतु तशी ती असली, तरी कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त ती करायला नकोत. 


आपली मौज आपल्या खर्चानं करायची असते. त्यासाठी इतरांना तोशीस कशासाठी? खाकी वर्दीतील अनेकजण मद्याच्या आहारी गेलेले असतात. कोणतीही गोष्ट अतिरिक्त झाली, की त्याचे दूरगामी परिणाम होतात. आधीच मर्कट त्यात मद्य प्याला अशी स्थिती होते. आपल्या वर्तनातून समाजापुढं आदर्श ज्यांनी ठेवायचा, त्यांच्या वर्तणुकीची जाहीर चर्चा होणं योग्य नसतं. खाकी वर्दीतील अधिकार्‍यांचा लोक सन्मान करतात. त्यांना खाऊ-पिऊ घालतात. तेवढ्यापुरतं आदरातिथ्य पुरेसं असतं. परंतु, जेव्हा हजारो रुपयाची दारू रिचवायची, मनसोक्त खायचं आणि संबंधित हॉटेलचालकाला पैसेच दिले नाही, तर त्याचा उदरनिर्वाह कसा चालेल, हा प्रश्‍न मद्यधुंद झालेल्याला पडू शकत नाही. त्याचं कारण मद्याच्या अंमलाखाली त्याची विचारशक्तीच खुंटीत झालेली असते. असे प्रकार वारंवार घडत असतात. परंतु, पैसे मागितल्याचा राग येऊन जेव्हा एखादा अधिकारी धुडगूस घालतो, ग्राहक ांनाही मारहाण करतो, तेव्हा त्या घटनेचं गांभीर्य वाढतं.
नगर जिल्हयाच्या शेजारी असलेल्या बीड जिल्ह्यातील एक अधिकारी आपल्या चार पंटरसह पाथर्डी तालुक्यात आला. त्यानं गाडीत वर्दी काढून ठेवली. गेवराई पोलिस ठाण्यात नियुक्तीला असलेला फौजदार तानाजी मालुसरे बंदोबस्तावरून घरी परतत असताना हॉटेल मधुबनमध्ये थांबला. त्यानं व त्याच्या सहकार्‍यांनी मद्याच्या 19 बाटल्या रिचवल्या. भरपूर खाल्लं. त्याला कोणाचीच हरकत असण्याचं काहीच कारण नाही. पैसे मागितल्याचा राग आल्यामुळं झिंग चढलेल्या तानाजी मालुसरेनं रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हॉटेल मधुबन येथे धिंगाणा घालायला सुरुवात केली. कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्यासाठी आपल्या रायबाचं लग्न नंतर करण्याचं जाहीर करून आधी कोंडाण्यावर लढणारा आणि किल्ला ताब्यात घेण्यासाठी मृत्यूला कवटाळणारा तानाजी मालुसरे कुठं? आईवडीलांनी नाव क ाहीही ठेवलं, तरी त्या नावाला साजेसं वागलंच पाहिजे, असं मुलांना कुठं वाटतं? आईवडीलांनी मोठया हौसेनं तानाजी मालुसरे असं नाव ठेवलं. परंतु, या आधुनिक तानाजी मालुसरेनं आपल्या पूर्वजांच्या नावाला तर कलंक लावलाच ; शिवाय आईवडीलांच्या नावाचा वेगळ्या अर्थानं उद्धार क रून घेतला. या वेळी मालुसरे यानं पोलिस असल्यानं मोठ्या आविभार्वात समोर येईल त्या ग्राहकाला, वेटरला मद्यधुंद अवस्थेत फ्री स्टाईलनं मारहाण केली. खासगी चारचाकी वाहनात वर्दी काढून ठेवलेल्या या महाशयांनी लोकांना शिव्यांची लाखोली वाहिली. ममी ड्युटीवर आहे, माझे कोणीही वाकडे करू शकत नाही’ असं बरळत हॉटेलमधील फर्निचर, टेबल, खुर्च्यांची मोडतोड केली. हा ॅटेलमध्ये जेवण करायला आलेल्या एका युवकाला मालुसरे यानं विनाकारण मारहाण केली. त्यामुळं संतप्त झालेल्या युवकानं मित्र मंडळी बोलावून मालुसरे यास बेदम चोप दिला. मालुसरे यानं कायदा हातात घेतल्यानं या युवकानंही कायदा हातात घेतला. ते चुकीचं असलं, तरी मद्यांधाला कोणीतरी अटकाव करायलाच हवा होता. तो त्यानं केला. मार खाऊन वर्दीला कलंक लावण्याचं काम मालुसरे यानं केलं.
एवढं होऊनही हॉटेल चालकानं भांडणं सोडवत होता. या फौजदार महाशयांनी कमरेला असलेलं पिस्तूल ग्राहक व हॉटेल चालकावर रोखलं. त्यामुळं सर्वांची काही काळ पाचावर धारण बसली होती. हॉटेल चालक मल्हारी शिरसाठ यांनी प्रसंगावधान राखत पाथर्डी पोलिस ठाण्यात घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले ; परंतु मालुसरे यानं पोलिसांनाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी याबाबत वरिष्ठांना कल्पना दिली. तात्काळ पाथर्डीचे फौजदार वैभव पेठकर हे सहकार्‍यासह घटनास्थळी दाखल झाले. मालुसरे यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू लागले असता त्यानं त्याच्याकडील सरकारी रिव्हॉलर टेबलवर आपटून तोडलं. मालुसरे यानं वैभव पेटकर यांच्या दोन श्रीमुखात भडकावल्या. उपस्थित गर्दी व पोलिसांनी मोठ्या हिकमतीनं बेफाम फौजदार अमोल मालुसरे यास ताब्यात घेतलं. घटनेचं चित्रीकरण हॉटेलच्या सीसीटीव्हीत झालं असून घटनेबाबत हॉटेल चालक मल्हारी शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून अमोल मालुसरे याच्या गुन्हा दाखल केला. वास्तविक सरकारी कामात अडथळा आणल्याची फिर्याद वैभव पेटकर यांनी द्यायला हवी होती. ती त्यांनी न देता हॉटेलचालकाला का द्यायला लावली, असा प्रश्‍न उपस्थित होतो. मालुसरे याला वाचविण्यासाठी तर असं केलं नाही ना ? एका पोलिस अधिकार्‍याविरोधात गुन्हा दाखल करताना दुसर्‍या पोलिस अधिकार्‍यानं पुरेशी काळजी न घेतल्यानं न्यायालयानं त्यावर आक्षेप नोंदविला, हे बरं झालं. आरोपी फौजदाराला पोलिस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडीत जावं लागलं. पोलिस यंत्रणा आपल्याच यंत्रणेचा भाग असलेल्याला वाचविण्यासाठी कशी धडपडते, हे त्यावरून स्पष्ट झालं आहे. हॉटेलचालकाच्या खांद्यावर बंदुक ठेवण्याचा हा प्रयत्न चुकीचा आहे.