Breaking News

भाविनिमगाव भवानीमातेच्या यात्रोत्सवास भाविकांची मांदियाळी


भाविनिमगाव प्रतिनिधी- श्री क्षेत्र भाविनिमगावचे ग्रामदैवत व जागृत देवस्थान असलेल्या जगदंबा मातेचा चैत्र पौर्णिमा यात्रोत्सव उत्साहात सुरु असून पहिल्या दिवशी नवस पूर्तीचे विविध धार्मिक कार्यक्रम आंबील वाटप, दुपारी विस्तवावरील रहाड व रात्री उशिरापर्यंत देवीची पालखी मिरवणूक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. उन्हाच्या काहीलीतही दिवसभर देवीच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली होती सकाळपासूनच होणारी दर्शनाची गर्दी लक्षात घेऊन यात्रा कमिटीने दर्शनाची चोख व्यवस्था ठेवल्याने भाविकांना सुलभ दर्शन घेता आले. येथील जगदंबा माता सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन भाविकांसाठी यात्रा परिसरात अनेक ठिकाणी शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत सामाजिक कार्य पार पाडले. आज सकाळी कलावंतांच्या व वाद्य पथकांच्या कलाकारांचा हजेर्‍यांचा कार्यक्रम पार पडणार असून दुपारी चार वाजता दरवर्षी प्रमाणे नामवंत पहिलवानांच्या हजेरीत कुस्त्यांचा हंगामा रंगणार असून हंगाम्यातील पंच कमिटीकडून चीतपट कुस्त्यांना चांगला इनाम देण्यात येणार असल्याने जास्तीत जास्त पहिलवानांनी हंगाम्यास उपस्थित राहण्याचे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने सरपंच पांडुरंग मरकड पै.उदय शिंदे, पै. राहुल मरकड, पै. बाळासाहेब मुंगसे, पै. गंगामामा जाधव, पै. दिनकर शिंदे व जगदंबा माता सामाजिक प्रतिष्टानचे अध्यक्ष संजय काळे यांनी केले आहे.