तापमानवाढीसह अवकाळी पाऊस
पुणे : राज्यात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पाऊस पडत असतानाच दुसरीकडे तापमानातही मोठी वाढ होत आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी पारा चाळिशीपार गेला आहे. मालेगाव येथे उच्चांकी 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मंगळवारपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वार्यांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर मंगळवारनंतर तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.राज्यात सायंकाळी ढगाळ हवामान होत असले तरी दुपारपर्यंत असलेल्या उन्हाच्या चटक्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी तापमान 38 अंशांच्या पुढे गेले आहे. मालेगावसह जळगाव, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ येथे तापमान 40 अंशांवर पोहचले आहे. पश्चिम राजस्थान आणि परिसरावरील चक्राकार वार्यांच्या स्थितीपासून नैर्ऋत्य मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असून, दोन दिवस पावसाची शक्यता आहे.