Breaking News

पठाणकोटमध्ये आढळले संशयित दहशतवादी

चंदीगड : दोन संशयित दहशतवादी आढळून आल्यानंतर पंजाबचा सीमावर्ती भाग पठाणकोट आणि शेजारील परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच सुरक्षा यंत्रणांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तान आणि जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागातील बामयाल सेक्टरमध्ये दोन बंदुकधारी दिसल्यानंतर पंजाब पोलीस, निमलष्करी दल आणि सैन्याने संयुक्तपणे शोध मोहीम सुरू केली आहे. याबाबत पठाणकोटचे जिल्हा पोलीस प्रमुख विकास शील सोनी यांनी माध्यमांना माहिती दिली. रविवारी रात्री संबंधित संशयितांनी मस्कीन अली यांची मारुती अल्टो गाडी थांबवत लिफ्ट मागितली. त्यानंतर अली व त्यांचे मित्रांनी तेथून पळ काढला आणि पंजाब पोलिसांना माहिती दिली. या माहितीच्या आधारे आज सकाळी शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. जम्मू व काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांनादेखील या हालचालींची माहिती देण्यात आली आहे. 2 जानेवारी 2016 ला हवाई दलाच्या पठाणकोट येथील ठिकाणावर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता. या ठिकाणी सैन्याचा ममून कँट देखील आहे. या हल्ल्याआधी 3 संशयित पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 27 जुलै 2015 ला हवाई दलाच्या गुरदासपूर जवळील दिनानगरच्या ठिकाणावर देखील हल्ला केला होता.