कुळधरण वनक्षेत्रातील पाणवठ्यावर पशु-पक्ष्यांंची गणना
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता पारंपरिक पाणवठा प्राणीगणना पद्धतीने ही गणना करण्यात आली. वन्यजीवांच्या अधिवासाचा अंदाज घेवून त्यादृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी या उपक्रमाचे विशेष महत्त्व आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने वन्यजीवांच्या हालचाली न्याहाळण्याची संधी वन्यजीवप्रेमी व अभ्यासकांना मिळाली. वन्यजीवांच्या हालचालींचा प्राथमिक अंदाज या गणनेदरम्यान आला. पूर्वी प्राण्यांच्या पायाच्या ठशानुसार प्राणीगणना केली जात असे. आजमितीस अत्याधुनिक जीपीएस प्रणालीचाही वापर या कामासाठी करण्यात येत आहे. मात्र या गणनेमध्ये पारंपरिक पध्दतीने प्राण्यांचे प्रत्यक्ष निरीक्षण करुन नोंदी करण्यात आल्या.
उन्हाळ्यात टंचाईमुळे पक्षी तसेच प्राण्यांना सहसा इतरत्र पाणी उपलब्ध होत नाही. वनक्षेत्रातील पाणवठ्यावर पाणी उपलब्ध करुन दिले जाते. त्यामुळे तेथे हमखास प्राणी पाणी पिण्यासाठी येतात. त्याचा विचार करुन या मोहिमेत प्रत्येक बीटवर पाणवठ्याजवळ बांबूच्या लाकडांचा वापर करुन झाडावर बसण्यासाठी मचाण उभारण्यात आले. त्यावर बसून वन कर्मचारी यांनी वन्यप्राण्यांच्या नोंदी घेतल्या. यामध्ये वनरक्षक डी.के. धांडे, आर.एस. कोळी, जे.एम. दाभाडे तसेच पी.ई.नजन, गावडे आदींनी काम पाहिले.