नाशिक पुणे महामार्गावर अपघातांत दोन ठार
संगमनेर : तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली व बोटा परिसरात झालेल्या अपघातांत दोन जण ठार तर पाच जण जखमी झाल्याची घटना घडली. मृतांमध्ये बाळू मारुती गोंधे (वय-70, रा.माहुली), ज्योतिबा हरि कुलाळ (वय-52,रा.जांबुत बुद्रुक) समावेश आहे. दोन दुचाकी आणि ट्रॅक्टरची धडक झाल्याने ही घटना घडली. केशव लक्ष्मण हांडे (वय-33), शितल केशव हांडे (वय-27) व जयेश केशव हांडे (वय-08 रा. रायतेवाडी, ता.संगमनेर) हे पती, पत्नी व मुलगा असे तिघे जण आपल्या मोटारसायक लीवरुन रायतेवाडी येथून घारगावच्या दिशेने जात होते. माहुली शिवारातील एकल घाटात हांडे यांचा मोटारसायकलीवरील ताबा सुटून मोटारसायकल महामार्गाच्या बाजूला असणा-या लोखंडी जाळीला धडकली आणि पुन्हा ती पायी जात असलेल्या बाळू मारुती गोंधे (वय-70,रा.माहुली) यांना धडकली. त्यामुळे हे सर्व जण जखमी झाले. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन या सर्व जखमींना औषधोपचारासाठी खासगी रुग्णवाहिकेद्वारे संगमनेरात खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले औषधोपचार सुरू असताना त्यांचा मृत्यु झाला. तर केशव हांडे, शितल हांडे, जयेश हांडे हे गंभीर जखमी झाले आहेत. दुसर्या अपघातात ज्योतिबा हरि कुलाळ (वय-52), मुलगा शंकर ज्योतिबा कुलाळ (वय-17, दोघे रा. जांबुत बुद्रुक, ता. संगमनेर) हे दोघे मोटारसायकलीवरुन जांबुत येथून घारगाव मार्गे आळेफाट्याच्या दिशेने जात होते. दुपारच्या दरम्यान बोटा शिवारात आले असता त्याच दरम्यान ट्रॅक्टरची धडक झाली. या अपघातात दोघे जखमी झाले. त्यांना औषधोपचारासाठी आळेफाटा येथे उपचार करण्यात आले. प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे ज्योतिबा कुलाळ यांना पुढील औषधोपचारासाठी पुणे येथे नेत असताना रस्त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला.