Breaking News

रणरणत्या उन्हात संथ वाहते प्रवरामाई! पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली


राहाता प्रतिनिधी - राहुरी, राहाता, श्रीरामपूरसह नेवासा तालुक्यातील प्रवरा नदीवरील १६ कोल्हापूर पध्दतीचे बंधारे भरून घेण्यासाठी सध्या प्रवरानदीला आवर्तन सोडण्यात आले आहे. ऐन रणरणत्या उन्हात प्रवरामाई दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे प्रवरा नदीकाठचा शेतकरी सुखावला आहे. शेतीबरोबरच सर्वांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यानिमित्ताने मार्गी लागला आहे. नदीचे पात्र वाळूतस्करांनी मोठ्या प्रमाणात ओरबाडल्याने मोठम़ोठ्या खड्ड्यांमुळे पाण्याचा वेग मंदावला आहे. आज {दि. १० } सकाळी ६ वाजता या पाण्याने श्रीरामपूर तालुक्यातील वळदगाव बंधाऱ्यातून पुढे मार्गक्रमण केले. 

उन्हाची तीव्रता वाढल्याने जमिनीतील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावत चालली आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले. रणरणत्या उन्हाने पाण्याचे उघडे असलेले जलस्रोत बाष्पीभवनाने नाहीसे होत चालले. त्यामुळे प्राणी आणि पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत होते. पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ बिबट्यांनी मानवी वस्तीचा आधार घेत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यातून बिबट्याचे मानवी हल्ल्याच्या प्रकारातही वाढ होताना दिसत आहे. सध्या गहू पिकाची काढणी प्रगतीपथावर आहे. गळिताच्या उसाची तोडही अंतिम टप्प्यात आहे. नुकतेच निळवंडेतून पिकासाठी सोडलेले आवर्तन पूर्ण झाले आहे. या आवर्तनाबरोबरच नदीपात्रातील बंधारे भरून घेण्यासाठी जोडीलाच प्रवरानदीपात्रातून आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या विहीरी व कुपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. या नदीपात्रातून असणाऱ्या विहीरींमधून पाणीउपसा होऊन जनावरांच्या चारा पिकांना या पाण्यामुळे जीवदान मिळणार आहे. गुरुवारी {दि. ५} बंधारे भरून घेण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले. नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग २ हजार ११९ इतका आहे. सकाळी श्रीरामपूर तालुक्यातील वळदगाव येथील बंधाऱ्यातून पाणी पुढे निघाले. नेवाशातील शेवटच्या नि एकूण ओझर ते नेवाशापर्यंत असलेल्या १६ कोल्हापूर पध्दतीचे बंधारे भरून घेतल्याशिवाय हे आवर्तन बंद होणार नसल्याचे पाटबंधारे विभागाच्या सुत्रांनी सांगितले.