Breaking News

आरोग्याच्या काळजीसाठी व्यसनापासून दूर रहा : काळे


कोपरगाव ता. प्रतिनिधी - आज प्रत्येक व्यक्ती धावपळीचे व ताणतणावाचे जीवन जगत आहे. त्यामुळे आरोग्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विविध आजार जडत आहेत. प्रत्येकाने वेळेचे योग्य व्यवस्थापन करून कामाच्या वेळातील तणाव कमी करावा व कामांना वेळेच्या चौकटीत बसवावे. त्यामुळे केलेले कामही उत्तम राहील. परंतु आपल्या कामाचा ताणतणाव कमी करण्यासाठी कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाता आपल्या आरोग्याची काळजी घेवून व्यसनापासून नेहमी दूर रहावे, असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले.

शिक्षणमहर्षी माजी खा. कर्मवीर शंकरराव काळेंच्या जयंतीनिमित्त कर्मवीर प्रतिष्ठान कोपरगाव व मॅग्नम हार्ट इंस्टिट्यूट, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या हृदयरोग तपासणी शिबिराच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

या शिबिरामध्ये प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. मनोज चोपडा यांनी ई. सी. जी. रक्तशर्करा तसेच हृदयरोगासंबंधिच्या सर्व तपासण्या मोफत करून हृदयाच्या तक्रारी असणा-या रुग्णांना अनमोल मार्गदर्शन केले. २४२ रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. याप्रसंगी जनार्दन स्वामी आश्रमाचे प. पू. रमेशगिरी महाराज, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे, अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालिका चैताली काळे, पोलीस निरीक्षक दौलत जाधव, नगराध्यक्ष विजय वहाडणे, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, सभापती अनुसया होन, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, जि. प. सदस्या सोनाली रोहमारे, अशोक खांबेकर, विजय आढाव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, कर्मवीर प्रतिष्ठानचे सर्व सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.