Breaking News

खासगी अन् नियमबाह्य कामे केली नाहीत म्हणून आकसाने कारवाई : प्रज्ञाताई वाळके

मुंबई/विशेष प्रतिनिधी :  मुंबई सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागात गेल्या पाच वर्षापासून नियमबाह्य आणि खासगी कामांना नकार देणार्‍या कार्यकारी अभियंत्यांना सुडाने वागविले जात असल्याचा गौप्यस्फोट अलिकडेच निलंबित झालेल्या शहर इलाखा विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रज्ञाताई वाळके यांनी केला आहे. आनंद कुलकर्णी यांच्याकडे बांधकाम विभागाच्या अति रिक्त प्रधान सचिवपदाची सुत्रे असतांना मुख्य अभियंता म्हणून कार्यरत असलेले सी.पी.जोशी यांच्या तत्कालीन दबावतंत्रांपासून बांधकाम सचिवपदाचा कारभार करण्यापर्यंत जोशी आणि त्यांचे वर्गमित्र असलेले अधीक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांच्या कार्यशैलीचा पर्दाफाश प्रज्ञाताई वाळके यांनी लोकमंथनशी प्रत्यक्ष संवाद साधतांना केला.


प्रज्ञाताई वाळके म्हणतात की, जोशी आणि सुर्यवंशी हे दोघेही नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील रहिवाशी असून वर्गमित्र आहेत. नाशिककर असल्याचा फायदा लाटून छगन भुजबळ यांचेशी सलगी साधत या दोघांनी सार्वजनिक बांधकाम विभागात कुटील प्रभाव निर्माण केला. बांधकाम विभागातील वरिष्ठ आणि कनिष्ठ सहकार्‍यांना मंत्री महोदयांच्या धाक दाखवून आपले इप्सित साध्य केले. विशेषतः मुंबई साबां प्रादेशिक विभागातील साबां मंडळातील कार्यकारी अभियंत्यांकडून नियमबाह्य तसेच काही खासगी स्वरू पाची कामे करून घेतली. भुजबळांनंतर चंद्रकांंत दादा पाटील यांच्या कार्यकाळातही या दोघांचे ते षडयंत्र अद्याप सुरू आहे. या दोघांच्या या कुकर्मामुळेच मुंबई साबांत प्रत्येक साबां मंडळात अनेक कार्यकारी अभियंत्यांना नियमबाह्य कामे करावी लागली आहेत. शहर इलाखाच नाही तर उत्तर मध्यमुंबई, मध्य मुंबई, उत्तर मुंबई अशा सर्व साबां मंडळांमध्ये नियमबाह्य कामे झाली आहेत. त्याला या दोघांची दबावतंत्राची कार्यशैली जबाबदार आहे. माझ्यावरही सी.पी.जोशी आणि अरविंद सुर्यवंशी या दोघांनी दबाव आणून नियमबाह्य क ामे करवून घेण्याचा प्रयत्न केला. तथापी मी भीक घातली नाही, म्हणून मला कथित प्रकरणात अडकवून माझ्याविरूद्ध आकस बुध्दीने कारवाई केली आहे. याविषयी या दोघांची फोन ध्वनिफित असून त्यापैकी एक ध्वनिफित तत्कालीन अतिरिक्त प्रधान सचिव आनंद कुलकर्णी यांनाही ऐकविली आहे. या दोघांना लवकरच न्यायालयात खेचणार असल्याचा इशारा प्रज्ञाताई वाळके यांनी लोकमंथनशी बोलतांना दिला आहे.