Breaking News

प्रगत तंत्रज्ञान शेतीपर्यंत पोहचवा : मुख्यमंत्री


नागपूर : कृषी क्षेत्रात उत्पादकता आणि उत्पादन वाढविण्यासाठी आज उपलब्ध प्रगत तंत्रज्ञान शेतीपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता ‘वनामती’ ही संस्था पूर्ण करेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, शनिवारी व्यक्त केला. नागपुरातील वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) येथील ‘वसंतराव नाईक स्मृती सभागृहा’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, वनामतीच्या माध्यमातून कृषीविषयक व प्रशासकीय बाबींचे प्रशिक्षण विविध गटांना देण्यात येते. आज सर्वात जास्त प्रशिक्षणाची आवश्यक ता कृषी क्षेत्राला असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वातावरणाच्या बदलामुळे कृषी क्षेत्रात अतिशय मोठ्या प्रमाणात स्थित्यंतरे येत आहेत. जोपर्यंत कृषी क्षेत्राला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड मिळत नाही, तोपर्यंत कृषी क्षेत्राला स्थैर्य प्राप्त होणार नाही. हवामानाचा वेध, जमीन तसेच पाण्याचे परिक्षण यासारख्या बाबींचे योग्य प्रशिक्षण दिल्यास शेतकर्‍यांना त्याचा निश्‍चितच फायदा होईल. शासन शेतकर्‍यांसाठी विविध योजना राबवित आहे. शासकीय योजना आणि नव तंत्रज्ञान सामान्य शेतकर्‍यांपर्यंत पोहचणे आणि त्याचा त्यांच्या शेतात वापर होणे हे अत्यंत गरजेचे आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील संबंधितांना प्रशिक्षण दिल्यास निश्‍चितच उत्पादकता वाढून उत्पन्नात भर होईल. वनामतीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील अधिकारी तसेच शेतकर्‍यांना नवीन पध्दतीने प्रशिक्षणे देणे गरजेचे असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.