Breaking News

महिला व बालिकांवरील अत्याचारांविरुद्ध घंटानाद


उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील भाजपाचे आमदार कुलदीप सिंग सेंगर यांच्या बलात्काराचे केंद्र व राज्य शासनाने बेजबाबदारपणे हाताळलेले प्रकरण, कथुआ (जम्मू काश्मीर ) येथील आसिफा या ८ वर्षाच्या बालिकेवर करण्यात आलेला अमानुष बलात्कार आणि निघृण हत्येत स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांसह येथील सत्ताधारयांचे गुंतलेले हात आणि दक्षिण मुंबईत ग्रांट रोड भागात देहव्यापारातील २ बळी महिलांना आत्महत्येला प्रवृत्त करणारया पोलिसांच्या निषेधार्थ स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद केला. शासकीय सुट्टी असल्याने निषेधाचे निवेदन इमेलद्वारे जिल्हाधिकारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांची प्रतिमा आणि भारतीय संविधानाचे पूजन यावेळी करण्यात आले. डॉ.आंबेडकर यांची स्मारके बांधण्यासोबतच त्यांनी देशाला दिलेल्या संविधानाची आणि नागरी मुलभूत अधिकारांची प्रतिष्ठा केंद्र आणि राज्य सरकारांनी ठेवावी, असे प्रतिपादन यावेळी श्रीमती जया जोगदंड यांनी केले. उन्नाव येथील घटनेत बलात्कारित महिलेच्या वडिलांचा संशयास्पद मृत्यू बलात्कार करणाऱ्यांनी घडविला. कथुआ येथील बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दाखल घेतल्यावर कारवाईला वेग आला. कथुआ येथील प्रकरणात ८ वर्षांच्या आसिफाला ८ दिवस नशेचे पदार्थ देऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आले आणि शेवटी तिचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. दक्षिण मुंबईतील ग्रँट रोड परिसरात एका पोलीसांच्या दहशतीमुळे पळून जाण्याचा प्रयत्न करताना दोन देहव्यापारातील बळी महिलांचा तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्याने मृत्यू झाला. दुर्दैवी घटना डी बी मार्ग परिसरातील ओम बिल्डिंग येथे घडली. काहीही कारण नसताना हफ्ता गोळा करण्यासाठी कुंटणखाण्यात घुसलेल्या पोलिसांच्या दहशतीमुळे तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारल्याने एका 50 वर्षांच्या तर दुसरया 30 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला.या महिलांना पश्चिम बंगालमधून मुंबईत आणून विकणारया संघटीत टोळ्यांना लगाम घालण्याऐवजी बळींवर दहशत करून त्यांचेच मृत्यू घडविले जात असल्याबद्दल महासंघाने राज्य शासनाचा तीव्र निषेध केला. यावेळी मीना पाठक, संगीता शेलार, जया जोगदंड, आशा पालवे, सुमन पांडे, शबनम शेख, शिल्पा केदारी, संजय खरात, सचिन ढोरमले, प्राची सोनावणे, संजय गुगळे, राजीव गुजर, बाळू वारुळे, अजय वाबळे, अनिल गावडे, सौ.अनिता माने, सुभाष शिंदे, संतोष धर्माधिकारी, लखन चव्हान, मनोज आहिरे आदी यावेळी उपस्थित होते.