Breaking News

स्वामी समर्थ बाल विद्यामंदिर शाळेचे यश

पाथर्डी/विशेष प्रतिनिधी : पाथर्डी शहरातील स्वामी समर्थ बाल विद्यामंदिर या आदर्श शाळेने, तिच्या उज्वल यशाची परंपरा अखंडित ठेवताना नुकत्याच पार पडलेल्या नॅशनॅलिस्ट टॅलेण्ट सर्च एक्झाम’ ह्या राज्यस्तरीय परिक्षेत या शाळेचे तब्बल तीन विद्यार्थी जिल्ह्यात अनुक्रमे दुसरा व तिसरा नंबर पटकावून उत्तीर्ण झाल्याने, या शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. विविध स्पर्धा परीक्षा, सामाजिक उपक्रम, स्नेहसंमेलन अशा विविध क्षेत्रांत या शाळेने उत्तुंग यश मिळविले आहे .राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर व डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने, इयत्ता दुसरी ते नववीपर्यंतच्या प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी यासाठी दरवर्षी आर.टी.एस.ई. ही परीक्षा आयोजित करण्यात येते. या परीक्षेचा 2018 चा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आल्याचे, या परीक्षेचे संचालक तथा डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे महासचिव लक्ष्मण नेव्हल यांनी जाहीर केले. शैक्षणिक क्षेत्रात नामांकित समजल्या जाणार्‍या ह्या स्पर्धा परीक्षेत पाथर्डी येथील स्वामी समर्थ बाल विद्या मंदिर, या आदर्श शाळेचे तीन विद्यार्थी जिल्हा पातळीवर अनुक्रमे दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने पालकांत जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. तन्वी महेश चव्हाण या चौथीतील विद्यार्थिनीने 150 गुण मिळवत जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला. तर विनय वासुदेव शिरसाठ व आयुष भाऊसाहेब लांडे या चौथीतील विद्यार्थ्यांनी समान 146 गुण मिळवत तिसरा संयुक्त क्रमांक पटकाविला. या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या नेत्रदीपक यशामुळे शाळेची विश्‍वासार्हता अजूनच वाढीस लागली असून संस्थेचे अध्यक्ष दिलीपशेठ भांडकर, मुख्याध्यापक एकनाथ ढोले व आर.टी.एस.ई. समन्वयक बंडू गाडेकर यांच्यावर अभिनंदनाचा तर यशस्वी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.