Breaking News

संतांची शिकवण जीवनाला दिशा देते - निलेश महाराज वाणी


शेवगाव - ( प्रतिनीधी ) - वै. नारायण बाबा झिंजुर्के महाराज यांची 26 वी पुण्यतिथी आखेगाव (ता. शेवगाव ) येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील संत एकनाथ महाराज मंदिरात वै. नारायण बाबा झिंजुर्के यांची महापुजा करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर निलेश महाराज वाणी यांचे किर्तन झाले. त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या तुकाराम गाथा मधील पवित्र सोवळी, एक तीच भुमंडळी , ज्यांचा आवडता देव, अखंडीत प्रेमभाव या अभंगाचे निरूपण केले. निलेश महाराज वाणी म्हणाले, संताचे विचार मनुष्य जीवनाच्या सर्वांगिण हिताचे आहेत. ते अंगिकारून प्रत्येकाने आपल्या जीवनात चांगले आचार - विचार ठेवावे. संतांनी दिलेली शिकवण ही जीवनाला योग्य दिशा देते.यावेळी सदगुरू जोग महाराज संस्कार केंद्राचे प्रमुख राम महाराज झिंजुर्के म्हणाले, प्रत्येकाच्या जीवनात आई वडिलांचे मोठे ऋण असते. त्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिेजे. आपल्या आई -वडिलांच्या पवित्र स्मृती परमार्थाच्या माध्यमातून कायमस्वरूपी टिकवून ठेवाव्यात. यावेळी शेखर महाराज, भवार महाराज, राजेंद्र महाराज काटे, विष्णू महाराज नजन, पंचायत समितीचे माजी सभापती माधव काटे, पं. स. सदस्य कृष्णा पायघन, जिल्हा माध्यमिक पतसंस्थेचे संचालक सुनिल काकडे, भगूरचे सरपंच वैभव पुरनाळे, जयदिप काटे, दादासाहेब डोंगरे, निलेश मोरे, ज्ञानेश्‍वर खरड आदी उपस्थित होते. देवटाकळी, बक्तरपूर, सुसरे, वडुले बुद्रुक, आखेगाव, भातकुडगाव, वरूर बुद्रुक, सोमठाणे आदी भक्ती -शक्ती पीठातील कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. या वेळी भाविकांना महाप्रसादाची पंगत देण्यात आली.