Breaking News

प्रज्ञा वाळकेंनंतर रणजीत हांडे यांचीही चौकशी होणार

मुंबई/विशेष प्रतिनिधी - शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मनोरा आमदार निवास अपहार प्रकरणी निलंबीत झालेल्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांच्या पाठोपाठ त्यांच्या आधी या विभागात कार्यकारी अभियंता असलेले रणजीत हांडे यांच्या मागेही चौकशीचा ससेमिरा सुरू झाला आहे. रणजीत हांडे यांच्या कार्यकाळातील पेव्हर ब्लॉकच्या कामाची तक्रार मुख्यमंत्र्यांना प्राप्त झाली असून नामदारांच्या मलबार हिल स्थित बंगल्याची देखभाल दुरूस्ती आणि आनंद कुलकर्णींचे विवादीत दालनाचे सुशोभीकरणही वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. 


15 ऑगस्ट 2015 रोजीच्या कार्यक्रमासाठी मंत्रालय इमारतीतील मुख्य बिल्डींग ते विस्तारीत बिल्डींग, आरसा गेट ते विस्तारीत बिल्डींग मध्ये तसेच गार्डन गेट ते विस्तारीत बिल्डींग गेट नंबर 6 ते 7 व आरसा गेट ते गेट नंबर 4 मध्ये पेव्हर ब्लॉक लावण्याचे प्रयोजन या प्रस्तावात होते. तत्कालीन कार्यकारी अभियंता सी.बी. पाटील यांनी दि. 6 डिसेंबर 2014 रोजी एकाच दिवशी पुर्णिमा मजुर सह. संस्था आणि विनायक मजुर सह. संस्था या दोघांना सदर कामांचा कार्यारंभ आदेश दिले. यात पुर्णिमा मजुर संस्थेला 14,78,993 तर विनायक मजुर संस्थेला 9,91,025 या सममुल्य रकमेचा ठेका मंजूर केल्याच्या कार्यारंभ आदेशात काम पुर्ण करण्याचा कालावधी दोन महिने इतका दर्शविला होता. त्यानंतर पाटील यांची बदली होऊन शहर इलाखा कार्यभार दि. 23 मार्च 2015 रोजी रणजीत हांडे यांनी घेतला. 
एस आकार आणि 203 बाय 101 सेमी आकारमान असलेले पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या या कामासाठी या दोन्ही कंत्राटदारांना काम पुर्ण केल्याचा पडताळणी अहवाल देऊन दि. 24 मार्च, 22 मे, व दि. 16 ऑक्टोबर 2015 रोजी दोन्ही कंत्राटदारांना या कामांचे देयके अदा केली. या काळात शहर इलाखा साबां विभागाचा प्रभार कार्यकारी अभियंता रणजीत हांडे यांच्या कडे होता. ही देयके अदा करतांना काम पुर्ण झाले याची पडताळणी करूनच देयके अदा करण्याचा कायदेशीर प्रघात आहे. या पेव्हर ब्लॉकच्या कामाचीही पडताळणी करून देयके अदा केली असतील, असे समज दृढ झाला होता. तथापी मंत्रालय परिसरात एस आकार आणि प्रस्तावित डायमेशनचे पेव्हर ब्लॉक तेंव्हापासून मंत्रालयात कुठेही दिसत नाहीत. मग रणजीत हांडे यांनी देयके अदा कुठल्या कामासाठी अदा केलीत? ज्या पेव्हर ब्लॉकच्या कामासाठी या शहर इलाखा साबां विभागाचे कार्यकारी अभियंता रणजीत हांडे यांनी 2015 मध्ये जवळपास चोवीस लाखाचे देयके अदा केली, ते पेव्हर ब्लॉक एकदाही मंत्रालय परिसरात दिसले नाहीत. हे पेव्हर ब्लॉक गेले कुठे? हा गुढ प्रश्‍न साबां प्रशासनाला पडला असून अदृश्य पेव्हर ब्लॉक प्रकरणात रणजीत हांडे यांचा सहभाग 6 फेब्रुवारी 2018 रोजी आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दिल्यानंतर चव्हाट्यावर आला.
केवळ पेव्हर ब्लॉकच नाही तर तत्कालीन अतिरिक्त साबां प्रधान सचिव आनंद कुलकर्णी यांच्या दालनात सुशोभिकरणाचे काम प्रस्तावित करून, कार्यारंभ आदेश दिले. कार्यारंभ आदेशात नमुद कार्यकाल पुर्ण होताच संबंधित कंत्राटदारांना देयकेही अदा केली. वास्तविक ज्या दालनात हांडे यांनी काम केल्याचे दाखविले त्या ठिकाणी आधीच काम पुर्ण क रण्यात आले होते. याचा अर्थ या दालनातही काम न करताच देयके अदा करून शासनाला फसविण्याची हांडे यांनी चलाखी दाखवली. विशेष म्हणजे मलबार हिल मधील नामदारांच्या बंगल्याची देखभाल दुरूस्ती करण्यातही रणजीत हांडे दाखवलेली हुशारी साबांच्या वेशीवर टांगली गेली आहे.
प्रज्ञा वाळके यांच्या निमित्ताने भ्रष्ट अभियंत्यांच्या कारकिर्दीला ग्रहण लागले असून येत्या काही दिवसात रणजीत हांडे यांच्याही या सर्व कामांची चौकशी होऊन कारवाई अपरिहार्य मानली जात आहे.