Breaking News

संवत्सर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला केवळ तीनच सदस्य उपस्थितीत


तालुक्यातील आदर्शगाव असलेल्या संवत्सर ग्रामपंचायतीच्या सदस्यांना पंचायतराज दिनाचे तसेच ग्रामसभेचे गांभीर्य नाही. 17 पैकी अवघे तीनच सदस्य ग्रामसभेला उपस्थित राहिले, त्याबद्दल ग्रामस्थ व संजीवनी कारखान्यांचे संचालक ज्ञानेश्‍वर परजणे यांनी आक्षेप नोंदविला आहे. ग्रामसेवक अहिरेंनी देखील गावच्या महत्वाच्या प्रश्‍नावर काही एक माहिती न देता दुसर्‍याच विषयावर ग्रामसभा भरकटवली असेही ते म्हणाले.
परजणे यांनी याबाबत निवेदनात म्हटले आहे की, 24 एप्रिल हा पंचायत राज दिवस. त्याचे विषेश महत्व आहे, मात्र संवत्सर ग्रामपंचायतीने त्यास हरताळ फासला. यावर गावात ग्रामसभेचे आयोजन केले. मात्र त्यास 17 पैकी अवघे तीनच सदस्य उपस्थित राहिले. शासनांच्या तसेच ग्रामपंचायत स्तरावर असणार्‍या विविध योजनांची माहिती ग्रामसभेतून नागरिकांना दिली जाते. मात्र पंचायत राज दिनाला याबाबत कुठलीही माहिती दिली गेली नाही. समाजसेवक अण्णा हजारे यांनी ग्रामसभेला विशेष अधिकार देवून त्याबाबत मोठी जनजागृती केली, पण संवत्सर ग्रामपंचायतीचे सदस्यांनी या घटनेस हरताळ फासला आहे. या ग्रामसभेत भाजपाचे तालुका उपाध्यक्ष रामभाऊ कासार, संजीवनी बँकेचे संचालक राजाभाऊ परजणे, प्रविण भोसले आदिंनी गावपातळीवरील सामाजिक योजनांची माहिती व संवत्सर ग्रामपंचायतींने त्यावरील कार्यवाहीबाबत विचारणा केली असता, ग्रामसेवक अहिरे यांना त्याविषयी उत्तरे देता आली नाही.