Breaking News

भटक्या विमुक्तच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी भोसले दाम्पत्याची धडपड


कुळधरण, देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके लोटली तरी भटक्या विमुक्त जमाती तसेच आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणणे शासनाला आजतागायत जमले नाही. विकासापासून कोसो मैल दूर असलेल्या समाजाची उन्नती व्हावी यासाठी अनेक व्यक्ती तसेच सामाजिक संस्था पुढे येतात. मात्र शासनाची धोरणे त्यांच्या कार्याच्या मुळावर उठत असल्याने कामाची गती मंदावत असल्याचे सध्याचे चित्र आहे. गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या पारधी समाजाची परिस्थिती आजही दयनीय आहे. परंतू या समाजातील मुलांनी शिक्षण घेवून मुख्य प्रवाहात यावे यासाठी कर्जत तालुक्यातील राशिनच्या युवकाची धडपड सुरु आहे. शिक्षण पूर्ण होवून ज्ञानाच्या कक्षा उंचावताच आदीवासी मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी करावे, हा विचार विजय भोसले व प्रणिता भोसले या दांपत्याच्या मनात घोळत गेला. संकल्प सामाजिक प्रकल्पाच्या उभारणीतून त्यांनी पारधी समाजातीलविद्यार्थ्यांसाठी राशिन येथे वसतीगृह सुरु केले.खडतर प्रसंगाला तोंड देत विद्यार्थ्यांच्या कल्याणातच त्यांनी सर्वस्व मानले आहे. उपेक्षित कुटूंबातील बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे पवित्र काम त्यांनी सुरु केलेले आहे. त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न.

शिक्षणाचा अभाव, व्यसनाधीनता, बेकारी, सततचे स्थलांतर आदी कारणांनी आदिवासी व भटक्या जमातीतील मागासलेपण दिसून येते. भटकंतीच्या जीवनप्रवासामुळे त्यांच्या कुटूंबातील मुले शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळे त्यांच्या जीवनपध्दतीत बदल होताना दिसत नाहीत. कर्जत तालुक्यात आदिवासी व भटक्या समाजाचे प्रमाण जास्त आहे. आदिवासी पारधी समाज तालुक्याच्या विविध भागात विखुरलेला आहे. गावाच्या बाजूला निर्जनसस्थळी, माळराने तसेच ओसाड भागात वस्त्या आहेत.गुन्हेगारीचा शिक्का लागलेल्या या समाजाला उपेक्षित जीवन जगावे लागत आहे. शिक्षणाच्या अभावामुळे मुलांवर संस्कार होत नाही. परिणामी त्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळत नाही. या मुलांच्या कल्याणासाठी सेवाभावी वृत्तीने सुशिक्षीत युवकाने राशिन येथे वसतीगृह सुरु केले. बीए. बीएड झालेल्या विजय भोसले व पत्नी प्रणिता भोसले यांनी संकल्प आदिवासी पारधी समाज विकास संस्था स्थापन करुन काम सुरु केले आहे. चिमुकल्या बालकांना शिक्षणाचे धडे देवून येथे संस्कारित केले जात आहे.

आदिवासी मुलांना प्रवेशीत करुन त्यांच्या संगोपनाची जबाबदारी या संस्थेने उचलली आहे. मात्र शासकीय धोरणाचा फटका या कामात बसत आहे. संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान मिळत नसल्याने सर्व संगोपनाची कामे लोकसहभागातून करावी लागत आहे. यासाठी संस्थेला मोठी कसरत करावी लागत आहे. राजकीय पुढारी, सामाजिक संस्था आदींकडे हात पसरुन मुलांसाठी धान्य, कपडे, शालेय साहित्य गोळा करावे लागते.वसतिगृहात मुलामुलींची राहण्याची, जेवनाची, शिक्षणाची सोय केली जात आहे. वसतीगृहात सकाळी प्राणायाम, व्यायाम, विविध दिनविशेष, जयंती असे समाजप्रबोधनाचे विविध उपक्रम राबवले जात आहेत. विविध उपक्रमांच्या आयोजनात हे विद्यार्थी भाग घेवून आपल्यातील कलागुण सादर करतात. त्यांच्यातील उपजत व अथक परिश्रमातून अवगत केलेल्या कलागुणांना चांगली दाद मिळत आहे. गावकुसाबाहेर ओसाड ठिकाणी पालात खितपत पडणारी मुले आज शिक्षणातून संस्कारित होत असल्याचे पाहुन आईवडिलांचे चेहरे आनंदाने फुलून जात आहेत. आईवडिलांच्या आयुष्यात आलेले उपेक्षित जीवन या चिमुकल्या बालकांना जगायचे नाही. वसतीगृहात राहत मोठे अधिकारी बनण्याचे त्यांचे स्वप्नरंजन सुरु असते. आईवडिलांकडे सुट्टीला गेलेल्या चिमुकल्यांचे मन तेथे रमत नाही. मला शिकून मोठे व्हायचे आहे या दुर्दम्य इच्छाशक्तीने ते झपाटून गेले आहेत. त्यांची स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी आपणही सामाजिक जबाबदारी म्हणून काही मदत करण्याची गरज आहे. भावनिक आधाराची गरज असलेल्या या बालकांसमवेत सुट्टीचा एक दिवस घालवत त्यांचे विचार ऐकून घेत त्यांना प्रेरणा दिली तरी त्यांच्यातील आत्मबळ वाढीस लागेल यात शंका नाही.

अशी करता येईल मदत...या वसतीगृहामध्ये प्राथमिक वयोगटातील विद्यार्थी वास्तव्याला आहेत. विद्यार्थ्यांना शाळेचे गणवेश, चप्पल, शालेय साहित्य, धान्य, जेवण अशा प्रकारे मदत करता येईल. मुलांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या गरजा समजून घेत मदत केल्यास त्यांच्यातील शिक्षणातील उर्मी अधिक जागृत होईल. याठिकाणी मदतीसाठी विजय भोसले यांना 9890411240 या क्रमांकावर संपर्क करावा किंवा प्रत्यक्ष वसतीगृहास भेट देवून आपले सहकार्य करावे.