Breaking News

उन्हाळ्याचे चटके वाढले, गरिबाच्या फ्रिजला बाजारात मागणी


कुळधरण, उन्हाळ्यात जीवाची लाहीलाही होत असताना माठातील थंड पाणी अमृताप्रमाणे गोड वाटते. गरिबाचा फ्रिज म्हणून पहिली पसंती माठाला असते.उन्हाच्या चटक्यामुळे जीव पाणी पाणी करतो. उन्हाचे चटके वाढतील तसे आजमितीस माठ तयार करण्याची कामे वेग धरु लागली आहेत.

यांत्रिक युगात फ्रिज असतानासुद्धा गोरगरीबांचा फ्रिज म्हणून ओळखल्या जाणार्‍या माठातील पाण्याची चव काही वेगळीच असते. या पाण्याचा गोडवा सर्वांचीच तृष्णा दूर करते. परंतू माठ घडविणारा समाज आजही उपेक्षित आहे. कुंभार समाजातील कारागिरांनी आपल्या कला कौशल्याने वेगवेगळ्या आकारात व काळानुसार परिवर्तन घडवून आणले आहे. रांजन, मडके, माठ, गाडगे आदी लहान-मोठ्या आकाराच्या मातीची भांडी बाजारात आणली जात आहेत. कर्जत तालुक्यातील राशिन, मिरजगाव, खेड, कोपर्डी, घुमरी, पिंपळवाडी आदी भागामधून माल विक्रीसाठी आणला जातो. आठवडे बाजारात तसेच घरपोच माठांची विक्री केली जात आहे. ग्रामीण भागात धान्याच्या बदल्यात माठ दिले जातात. उन्हाळा सुरू होण्याच्या आतच या कामांना वेग येतो. कुंभार समाजासाठी संक्रांत आणि उन्हाळा हे सुगीचे दिवस असतात. 

मातीच्या वस्तू बनविण्याचा व्यवसाय करणार्‍या या समाजातील नवीन पिढी मात्र या व्यवसायाप्रती उदासीन असल्याचे दिसते. माठ घडविण्यासाठी कुंभाराला गरम भट्टीचे व शासन आणि समाज व्यवस्थेचे चटके सहन करावे लागतात. कुंभार समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार अत्यल्प असल्याने संपूर्ण कुटूंब याच व्यवसायावर अवलंबून असते. दिवसभर कामामुळे आई-वडिलांना मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देता येत नाही. कष्ट करुनही समाधानकारक उत्पन्न मिळत नसल्याने नवीन पिढी या पारंपारिक कामाकडे कानाडोळा होत आहे. त्यांना या व्यवसायात मुळीच रस नाही. शासनाने या समाजाकरिता माठ तयार करण्याचे नवीन तंत्रज्ञान वापरुन तरुणांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. तरच या व्यवसायातून तोकडे की होइना अर्थार्जन शक्य आहे.