Breaking News

नान्नज होणार पाणीदार,श्रमदानासाठी लोकसहभाग वाढला.

जामखेड ता.प्रतिनिधी - सतत पावसाचे प्रमाण कमी व दुष्काळ प्रवण क्षेत्राच्या छायेत असलेल्या जामखेड तालुक्यातील गावे दुष्काळ मुक्त करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियानातून मोठी कामे केली पण त्यात लोक सहभाग कमी होता.आता लोक श्रमदानातून पाणी फाउंडेशन वॉटर कप या स्पर्धेमध्ये तालुक्यातील 28 गावानी सहभाग घेतला आहे यामध्ये पंचेचाळीस दिवसांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्यातील नान्नज या गावाने या स्पर्धेत सहभाग घेतला असून आपले गाव दुष्काळ मुक्त व जलमय करण्यासाठी नान्नजकरांनी आपली कंबर कसली आहे.


पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेचे नान्नजच्या नागरिकांनी जल्लोषात स्वागत करून श्रमदानाला सुरवात केली. नान्नजकरांच्या या श्रमदानास मोठा प्रतिसाद मिळत असून महिला, नागरिक, युवक, शालेय विद्यार्थी तसेच जेष्ठ नागरिक हे श्रमदान करून आपले योगदान देत आहेत. गावातील सर्वच क्षेत्रातील नागरिक, महिला व युवक वर्गाचा श्रमदानामध्ये सहभागासाठी लगबग सुरू झाली आहे. सीसीटी (समपातळीवर चर) खोदण्यास, लूज बोर्डर,(दगडी बांध) व मातीनाला बांध आदी कामास सुरूवात केली आहे.
गावात मशाल फेरी काढून पाणलोट क्षेत्र विकासाचे महत्त्व याबाबत सरपंच डॉ. विद्या मोहळकर यांनी प्रबोधन केले. हिवरे बाजार येथे या स्पर्धेचे प्रशिक्षण घेऊन आलेल्या सागर पवार, डॉ. विद्या मोहळकर, नितीन मोहळकर, मनीषा मोहळकर, शशी कोळपकर, सुरेखा कोळपकर आदींच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून श्रमदानाचा लोट उसळला आहे. या स्पर्धेत जामखेड तालुक्यासह राज्यातील अनेक गावांनी सहभाग घेतला असून सर्वोत्कृष्ट काम करणार्‍या गावाला 10 लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार असल्याने नान्नजचे नागरिक एकजुटीने पुढे सरसावले असून श्रमदानास मोठी सुरूवात झाली आहे.