पैलवानांनी गाजविला कुस्त्यांचा फड
राहुरी शहराचे ग्रामदैवत खंडेरायाच्या यात्रेनिमित्त सोमवारी भरविण्यात आलेल्या कुस्त्यांच्या जंगी हगाम्यास राज्यभरातील नामवंत पहिलावानांनी हजेरी लावली. पैलवानांनी चितपट कुस्त्या करुन उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. रविवारी {दि.१ } वाय. एम. सी. ए. मैदानावर रंगलेल्या या चित्तथरारक कुस्त्यांच्या हगाम्यात लहान लहान मल्लांच्या कुस्त्या लावण्यात आल्या.
महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून आलेल्या पहिलवानांनी हलगीच्या तालावर चितपट व चित्तथरारक कुस्त्या केल्या. प्रत्येक निकाली कुस्त्यांना उपस्थित टाळ्यांनी दाद देत होते. या हगाम्यातील कुस्त्यांसाठी पंच म्हणून महाराष्ट्र केसरी पै. गुलाब बर्डे, नितीन तनपुरे, पत्रकार राजेंद्र वाडेकर, जाफर शेख, सोन्याबापू जगधने, बापूसाहेब वराळे यांनी चोख भूमिका निभावली.
हगामा यशस्वीतेसाठी देवस्थानचे सुरेश शेटे, गोरख चव्हाण, नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते शिवाजी सोनवणे, शिवाजी डौले, दिलीप राका, नरेंद्र शिंदे, सुरेश भुजाडी, माजी उपनगराध्यक्ष आर. आर. तनपुरे, रंगनाथ तनपुरे, ज्येष्ठ नेते संपतराव उंडे, तात्या काशिद, गणेश खैरे आदींनी परिश्रम घेतले.