Breaking News

श्रीगोंद्यातील कुष्ठरोग निवारण, पुनर्वसन केंद्र सुरु करणार


श्रीगोंदा-मांडवगण रोडवरील गणपती मला येथे सुमारे पन्नास वर्षांपुर्वी दि अखिल भारतीय कुष्ठरोग समितीद्वारा इंदिरा लेप्रेसी होमच्या माध्यमातून कुष्ठरोग दवाखाना सुरु करण्यात आला होता. मात्र परिसरातील कुष्ठ रुग्णांबाबत लोकांमध्ये असलेल्या गैरसमजुतीतून या रुग्णालयास स्थानिकांनी विरोध केल्यामुळे सदरचे रुग्णालय बंद करावे लागले. परंतु आता समाजात जनजागृती निर्माण झाल्याने श्रीगोंदा येथे काही दिवसातच राज्याचे राज्यपाल यांच्या परवानगीने सुरु करणार असल्याचे दि अखिल भारतीय कुष्ठरोग समितीचे अध्यक्ष माणिक भडंगे यांनी सांगितले. श्रीगोंदे शहरानजीक मांडवगण रोड येथे सुमारे पन्नास वर्षांपूर्वी शासकीय जागेत सुरु केलेला परंतु तो सद्यस्थितीत बंद असलेल्या कुष्ठरोग दवाखान्यास बुधवारी दि अखिल भारतीय कुष्ठरोग समितीचे अध्यक्ष माणिक भडंगे यांच्यासह शिष्ट मंडळाने भेट देऊन पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की, ज्या कुष्ठ रुग्णांना समाजातील लोक पहाताच नाकाला हातरुमाल लावतात, त्यांचा तिरस्कार करतात, अशा लाचार कुष्ठरोग पिडीत लोकांना समाजात जगवण्याचे कार्य आम्ही करत आहोत, तसेच आत्ता श्रीगोंदा येथे देखील यापुर्वी गैरसमजुतीतून बंद करण्यात आलेला कुष्ठरोग दवाखाना मा. राज्यपाल यांच्या आदेशानुसार सुरु करणार असल्याचे भडंगे यांनी सांगितले. यावेळी अमोल अदमाने, रावसाहेब पोटघन, कविता भडंगे उपस्थित होते.