अग्रलेख - सांस्कृतिक चळवळीतील संघर्ष !
सामाजिक, सांस्कृतिक चळवळीमुळे एकीकडे सामाजिक अभिसरणाबरोबर, सामाजिक धुव्रीकरण ही घडून येत असतांना आजची देशातील एकंदर परिस्थिती बघता, आपली वाटचाल अराजकतेकडे तर सुरू नाही ना ? असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. लोकशाही संपन्न असलेल्या देशात अलीकडच्या काही घडामोडी बघता, सामाजिक सांस्कृतिक संघर्ष हा किती तीव्र झाला आहे, याची कल्पना येते. मात्र या सांस्कृतिक संघर्षातून वैचारिक मंथन होवून काहीतरी नवीन उदयाला येईल अशी अपेक्षा असली तरी, प्रतिगामी शक्ती पुन्हा आपल्या मानगुटीवर बसण्यासाठी नेहमीच नवीन फंडे वापरत आहे, तितक्याच मोठया प्रमाणात ती सक्रिय आहे. त्यामुळे येणार्या काळात आपल्यासमोर मोठे आव्हान आहे. कोणत्याही देशात लोकशाही सक्षमपणे रुजण्यासाठी खर्या अर्थाने गरज आहे ती मुक्तपणे स्वातंत्र्यांची. तेथील जनतेला आपले हक्क, अधिकार मुक्तपणे उपभोगता आले पाहिजे. मात्र आजमितीस देशातील वातावरण बघितले की, आपण कोणत्या मार्गाने चाललो आहोत, आणि शासनकर्ते त्याला कोणत्या मार्गाने घेवून हे बघितले म्हणजे देशातील असहिष्णूता का वाढत आहे हे कळते? देशातील सामाजिक, सांस्कृतिक चळवळीत सरकारविषयी त्यांच्या धोरणाविषयी किती मनस्वी चीड आहे, हे लक्षात येते. धर्मनिरपेक्ष वातावरणाला तिलांजली देत, धार्मिक वातावरण दूषित करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. जिथे जिथे सामाजिक सांस्कृतीक चळवळ ताकदीने उभी आहे, तिथे तिथे समाज अधिक डोळसपणे निधर्मी पायावर उभा असल्याचे जाणवते. त्यामुळेच विरोध वाढण्याचे प्रमाण वाढत आहे. सांस्कृतीक चळवळीमध्ये समाविष्ट झालेला माणूस हा आपल्या जातीचा अथवा धर्माचा मुखवटा घरामध्ये ठेवूनच बाहेर पडतो. अन्यथा त्याला सांस्कृतिक चळवळीचा अभिन्न अंग बनून वावरता येणारच नाही. या चळवळीमध्ये स्वत:ला झोकून देऊन आपल्या कलेशी इमान राखावे लागते, समाजाशी बांधिल राहावे लागते, त्यामुळेच विद्रोहाच्या घटना घडतात. सांस्कृतिक चळवळीत जातीभेद, धर्मभेद व पंथभेदाच्या भिंती उखडून टाकतो. ‘कला असे मानवासी भूषण‘ असे आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आम्हाला ठामपणे सांगतात. माणसाजवळ किती धन आहे? यापेक्षा आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाप्रती किती बांधील आहे याला महत्व आहे. कलेनेच माणसाला श्रेष्ठत्व प्राप्त होते व माणूस सन्मानासाठी पात्र होतो. कला मग ती कोणती का असेना. एखादा नृत्यकलेत निपुण असेल, कुणी गायनात कुशल असेल, एखाद्याकडे संगीतामधील तबलावादन, बासरवादन अशी कला असेल. अहो, भाषण, निबंध अथवा रांगोळी रेखाटणे हा सगळा कलात्मकतेचाच भाग आहे. या सगळ्या कलांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम सांस्कृतिक चळवळ करीत असते. या सांस्कृतिक चळवळीलाच मरगळ आली, तर माणसांच्या अंगी असलेल्या कलात्मकतेला उत्तेजन कसे काय मिळेल? कलात्मकता वृद्धिंगत झाली नाही, तर निकोप व सुदृढ समाजाची निर्मिती होईल काय? म्हटले तर, ही एक चिंतनशील बाब आहे. पूर्वीच्या काळी कलावंताला राजाश्रय मिळायचा. प्रत्येक राजाच्या दरबारी एखादा तरी कवी असायचाच. नुसत्या कविता रचून त्या कवीचे पोट भरायचे, परंतु त्याच्या कवितांनी दिलेली वैचारिक देणगी समाजापर्यंत पोहोचायची अन त्यातूनच घडायचे विचारमंथन! एक प्रकारे तत्कालीन सांस्कृतिक चळवळच राजाश्रयावर अवलंबून असायची.