Breaking News

जळगाव अधिक्षक अभियंत्यांची कार्यालयाच्या सुशोभिकरणासाठी लाखोंची उधळपट्टी


जळगांव/ विशेष प्रतिनिधी - बचतीचा मंत्र देऊन प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची शासनाने दिलेली जबाबदारी पार पाडण्याऐवजी शासकीय निधीची उधळपट्टी करून स्वतःचे दालन सुशोभित करण्यासाठी लाखोंचा अनावश्यक खर्च करण्याचे धाडस दाखवणारे अधिक्षक अभियंता सोनवणे यांचा सुबेच्या 3054 लेखाशिर्षाखालील कामांचा पराक्रमही चव्हाट्यावर आला आहे. ई - टेंडरच्या शर्तींना फाटा देऊन स्पिल्ट अपचा प्रमाद करणारे अधिक्षक अभियंता सोनवणे यांच्या या बेकायदेशीर कृत्याची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पुढे आली आहे. दरम्यान जळगाव साबां मंडळाच्या या कारनाम्याविषयी महाराष्ट्रातील अन्य साबां मंडळातील अधिक्षक अभियंता असुयेने तोंडात बोट घालीत आहेत.

जळगांव सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंता सोनवणे यांच्या कार्यकाळात सुबे 3054 लेखाशिर्षाखाली खर्च झालेला निधी आणि राबविली गेलेली निविदा प्रक्रीया सर्वदूर चर्चेचा विषय ठरली आहे.सार्वजनिक हित नजरेसमोर ठेवून महाराष्ट्र शासन प्रस्तावित विविध विकास कामांसाठी निधी मंजूर करते. मात्र जळगाव साबां मंडळ कार्यालयात हा सार्वजनिक हेतु पायदळी तुडवून शासकीय निधीची उधळपट्टी व्यक्तीगत समाधानासाठी सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे. अधिक्षक अभियंता सोनवणे यांनी हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवून गाव जेवण देण्यासारखा प्रकार केल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
अधिक्षक अभियंता सोनवणे ज्या कार्यालयात बसून जळगाव साबां मंडळाचा कारभार करतात ते कार्यालय सुस्थितीत असतांना स्वतःची हौस भागविण्यासाठी चांगल्या स्थितीतील फर्निचर उखडून आपल्या कार्यालयात नवीन फर्निचरसह अन्य सुशोभीकरण करण्यासाठी तब्बल 8 लाख 46 हजार 900 रूपयांच्या शासकीय निधीची उधळपट्टी केली. या शिवाय जळगाव जिल्हा सत्र न्यायालय निवासस्थान किरकोळ दुरूस्ती, जळगाव जिल्हा कारागृह विशेष दुरूस्ती, जळगाव शहर पोलिस ठाण्याच्या आवारातील राज्य गुप्त वार्ता विभागाच्या कार्यालयातील दुरूस्ती, पाठरे दिगर सटाणा चाळीसगाव भडगाव पाचोरा राज्य मार्ग 19/186/800 व 188/200 वरील पुलांची दुरूस्ती, जळगाव जिल्हा कारागृहातील शौचालयाचे बांधकाम, जामोद येथील खुले सभागृह, बोदवड ग्रामीण रूग्णालायाची दुरूस्ती अशा अनेक कामांवर प्रत्येकी लाखोंची उधळपट्टी करण्यात अधिक्षक अभियंता सोनवणे यांनी हात मोकळा सोडल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे बोदवड ग्रामीण रूग्णालयाचे काम प्रस्तावित करतांना ई-टेंडरींगच्या शासनाच्या अटी शर्तींना स्पिल्ट अपच्या बाजारात मांडून कामांचे तुकडे पाडण्याचा घोर प्रमाद केला. अधिक्षक अभियंता सोनवणे यांचा हा पराक्रम एका बातमीत कथन करून संपणार नाही म्हणूनच सोमवारपासून प्रत्येक कामांचा हिशेब मांडण्यासाठी लोकमंथन कटीबध्द आहे. (क्रमशः)