Breaking News

गटशिक्षणाधिकारी पुर्ववैमनस्यातून ढवळपुरी आश्रमशाळेस त्रास देत असल्याचा संस्थेचा आरोप

पारनेर (प्रतिनिधी)- धन्वंतरी मेडिकल अ‍ॅण्ड एज्युकेशनल फाऊंडेशन संचलित ढवळपुरी (ता.पारनेर) येथील आश्रमशाळेस कुठलेही पुरावे नसताना गटशिक्षणाधिकारी मागील पूर्वगृह दुषितपणा ठेवून व हेतूपुर्वक त्रास देत असल्याचा खुलासा संस्थेचे अध्यक्ष डॉ.सईद काझी यांनी केला. आश्रमशाळेच्या हंगामी वसतिगृहाच्या बोगस विद्यार्थी असल्याचा आरोप करण्यात आला असता त्यांनी पत्रकार परिषद घेवून पालकांच्या उपस्थितीत खुलासा केला. तर वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी संस्थेचे कार्य उत्तम चालू असताना पुर्ववैमनस्यातून संस्थेला त्रास दिला जात असल्याने पालकांनी संस्थेच्या पाठिशी राहण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच विद्यार्थ्यांना अडचण येवू नये म्हणून संस्थेचे थांबवून ठेवलेले अनुदान तातडीने देण्याच्या मागणीचा सुर पालकांच्या बैठकित उमटला. 

सध्याचे गटशिक्षणाधिकारी संभाजी झावरे यांनी सन 2011 मध्ये संस्थेच्या अध्यक्षा विरुध्द विनाकारण कुठलेही पुरावे नसताना तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांच्याविरुद्ध तक्रार केलेली होती. या अनुषंगाने संस्थेच्या अध्यक्षांनी झावरे यांच्यावर पारनेर पोलिस स्टेशनला संस्थेची, आश्रमशाळेची व वैयक्तिक बदनामी केल्याबाबत लेखी तक्रार केलेली होती. संस्थेस व आश्रमशाळेस त्रास देण्याच्या हेतूने माहिती अधिकाराचा गैरवापर करून मागितलेली माहिती देऊनही प्रथम अपिलीय अधिकारी तथा सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्याकडे अपील दाखल केले होते. धर्मदाय आयुक्तांनी हे अपील फेटाळले आहे. झावरे यांच्याकडे सध्या पारनेर पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी पदाचा कारभार असल्याने मागील पूर्वगृह दुषितपणा ठेवून व हेतूपुर्वक आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून आश्रमशाळा ढवळपुरी या शाळेस जाणीवपुर्वक त्रास देत आहे. दहावी बोर्ड परीक्षा वेळी देखील पेपर चालू असताना विद्यार्थ्यांना तणावाचे वातावरण तयार केल्याचे व हंगामी निवासी वस्तीगृहाबाबत जाणीवपुर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप डॉ.काझी यांनी केला आहे.
धन्वंतरी मेडिकल अ‍ॅण्ड एज्युकेशनल फाऊंडेशन संचलित ढवळपुरी (ता.पारनेर) येथील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा येथे अति दुर्गम व डोंगराळ भागांमध्ये भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी आश्रमशाळा 1996 पासून चालवली जाते. सुरुवातीला 18 विद्यार्थ्यांवर सुरू झालेल्या या आश्रमशाळेमध्ये आज दोन हजारपेक्षा जास्त मुले-मुली निवासी, अनिवासी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळेचा शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात नावलौकीक असल्याने या आश्रमशाळेमध्ये 58 जाती-जमातीचे 16 जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. या ढवळपुरी परिसरात अनेक भटक्या विमुक्त जाती जमाती चा समाज आहे. त्यात धनगर, लमाण, वंजारी, भिल्ल, ठाकर हा समाज आपल्या उदरनिर्वाहासाठी व्यवसायानिमित्त मेंढपाळ, ऊसतोड, कोळसा, मजुरीसाठी वारंवारपणे भटकंती करीत असतो.
या भटकंती करणार्‍या पालकांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची कायमस्वरूपी सोय व्हावी म्हणून संस्थेने 1996 ला प्राथमिक आश्रमशाळा सन 2004 पासून माध्यमिक आश्रमशाळा व सन 2008 पासून उच्च माध्यमिक आश्रमशाळा सुरू केली. परंतु आश्रमशाळेतील वस्तीगृह इयत्ता पहिली ते बारावी पर्यंन्त 320 निवासी विद्यार्थ्यांची मान्यता सामाजिक न्यायविभाग यांचेकडून मिळालेली आहे. प्रत्यक्षात परिसरातील विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने या समाजातील अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहून शालाबाह्य होत होते. इतर ठिकाणीही त्यांचे शिक्षणाची सोय होत नव्हती. संस्थेकडे व शाळेकडे अनेक पालक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रवेश मागत होते. परंतु निवासी वस्तीगृहाची संख्या मर्यादित असल्या कारणाने जास्तीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शक्य नव्हते. या विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी व हे विद्यार्थी शाळाबाह्य होऊ नये म्हणून सन 2005 मध्ये सेतू शाळा सुरू करण्यात आली. या शाळेमध्ये 26 विद्यार्थी प्रवेशित होते. त्यानंतर सेतु शाळेचे रूपांतर हंगामी वसतिगृहामध्ये झाले आणि सन 2006-07 आजतागायत या हंगामी वस्तीगृहामुळे अनेक शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होऊ लागले. इयत्ता दहावी, बारावी चा शाळांत प्रमाणपत्र परीक्षा निकाल गेल्या दहा वर्षापासून शंभर टक्के लागत आहे. यातील बहुतेक मुले-मुली 80 ते 90 टक्के गुण मिळवून मेडीकल, इंजिनियरिंग, बी एस्सी अ‍ॅग्रीसाठी प्रवेशित झालेली आहेत. शैक्षणिक गुणवत्ता चांगली असल्याने व वसतिगृहातील भौतिक सोयी-सुविधा चांगली असल्याने ढवळपुरी परिसराबरोबर बाहेरील तालुक्यातील व जिल्ह्याबाहेरील व्यवसायानिमित्त स्थलांतर करणार्‍या पालकांचा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी कल वाढत गेला. त्यामुळे या चालू शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये 717 विद्यार्थी हंगामी वस्तीगृहात प्रवेशित झाले. तसं लिहित नमुन्यातील प्रस्ताव शासकीय कार्यालयामार्फत शासनास सादर केला. प्रत्यक्षात हंगामी वसतिगृहात 717 विद्यार्थी प्रवेशित आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये पारनेर तालुक्यातील 327 विद्यार्थी प्रवेशित आहेत तर तालुक्याबाहेरील 390 विद्यार्थी प्रवेशित आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची तालुका व जिल्हा स्तरावरून अनेक वेळा वेगवेगळ्या अधिकार्‍यांनी भेट देऊन तपासणी केलेली असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.