अहमदनगर जिल्ह्यात बाल कल्याण समितीच्या सदस्यांची निवड
अहमदनगर जिल्ह्यात मागील २ वर्षापासून बाल कल्याण समितीचे कार्य बंद पडले होते. काळजी व सरंक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी उचित आदेश मिळवण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याच्या कार्यभार सोपविण्यात आलेल्या नाशिक जिल्ह्यातील बाल कल्याण समितीकडे जावे लागत होते. यामुळे बालकांसोबत काम करणाऱ्या बालसेवी संस्थाना आणि समस्याग्रस्त बालकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत होते. दीर्घ प्रतीक्षेनंतर अहमदनगर जिल्ह्यासाठी बाल कल्याण समिती नियुक्त झाल्याने बालसेवी संस्थानी समाधान व्यक्त केले.
बाल न्याय (मुलांची काळजी व सरंक्षण) अधिनियमानुसार बाल कल्याण समिती प्रत्येक जिल्ह्यात नियुक्त केली जाते. ० ते १८ वर्षांपर्यंतच्या काळजी व सरंक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी काम करतांना बालसेवी संस्थांना सुयोग्य आदेश समिती देते. ही समिती पुढील ३ वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्त करण्यात आली आहे.
बालकांचे हक्क, अधिकार, कर्तव्ये, शिक्षण आणि पुनर्वसन यासाठी जिल्ह्यात सुयोग्य वातावरण पोलीस, बालसेवी संस्था, महिला बाल विकास विभाग, शासकीय विभाग, तसेच समाजातील बालसेवी कार्यकर्ते यांच्यात बालकांच्या हक्करक्षणासाठी जाणीवजागृती आणि समन्वयाचे कार्य बाल कल्याण समिती करते. बाल कल्याण समितीचे कार्यालय शासकीय निरीक्षण गृह, आयुर्वेद महाविद्यालय जवळ, अहमदनगर येथे आहे.