मनसेकडून ‘नाणार’ प्रकल्पाच्या ऑफिसची तोडफोड
मुंबई : मनसे कार्यकर्त्यांनी ताडदेव येथील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या ऑफिसची तोडफोड केली. रविवारी मुंलुंड येथे झालेल्या मनसेच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत कोकणात होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका मांडली होती. काही दिवसांपूर्वी या प्रकल्पाला विरोध करणार्या नाणारवासियांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. सरकारकडून या प्रकल्पासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला तर मनसे त्याविरोधात रस्त्यावर उतरेल, असे आश्वासन राज यांनी नाणारवासियांना दिले होते. त्यानंतर काल मुंलुंड येथे झालेल्या सभेत, नाणार प्रकल्प कोणत्याही स्थितीत कोकणात होऊ देणार नाही. सरकारने काय करायचे ते करावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धमकी देत आहेत की, तो प्रकल्प कोकणात झाला नाही तर गुजरातला हलवण्यात येईल. पण, गुजरातच का? दुसरी राज्य काय मेली आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांची टर उडवली. सगळ्या गोष्टी गुजरातमध्येच का नेता? रिफायनरी प्रकल्प चंद्रावर न्या. पण, कोकणात हा प्रकल्प होणार नाही. येथे कुंपणच शेत खात आहे, असे म्हणत त्यांनी सरकारला लक्ष्य केले.