Breaking News

महाऑनलाईनच्या संकेतस्थळावरील दाखलेच गायब! विद्यार्थी आणि पालक चिंताक्रांत


राहुरी राज्य शासनाने विविध प्रकारचे दाखले ऑनलाईन देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळेल असे वाटत होते. परंतू महाऑनलाईनच्या संकेतस्थळावरील दाखलेच गायब झाल्याने विद्यार्थी चिंताग्रस्त बनले आहेत. आता पुन्हा दाखले मिळवायचे असल्यास नव्याने कागदपत्र गोळा करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 
राज्य शासनाने गेल्या वर्षापासून जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले, राष्ट्रीयत्वाचे दाखले, नाॅनक्रिमिलेयर दाखले, शेतकरी असल्याचे दाखले आदींसह विविध प्रकारचे दाखले ऑनलाईन देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांचा तहसिल कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय आदी ठिकाणी हेलपाटे मारण्याचा ताण वाचला, असे वाटत होते. मात्र प्रत्यक्षात दाखले ऑनलाईन टाकल्यानंतर सुमारे तीन महिन्यानंतर सदरचे दाखले संकेतस्थळावरून आपोआप नाहीसे झाले आहेत. उपविभागीय अधिकारी यांनी तीन महिन्यात सदर जातीच्या दाखल्यावर निर्णय घेणे अपेक्षित असते. राज्य शासनाने सेवा हमी कायद्याअंतर्गत जातीचे दाखले पंधरा दिवसांत अर्जदारास देणे बंधनकारक आहे. मात्र बहुतांश ठिकाणी उपविभागीय अधिकारी जातीच्या दाखल्यावर निर्णय देत नसल्याने संकेतस्थळावरून हटविले जातात. राहुरी तालुक्यातील गेल्या तीन महिन्यांपूर्वीचे सुमारे ७० ते ८० जातीचे दाखले श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी यांनी ऑनलाईन स्वाक्षरी न केल्याने महाऑनलाईनच्या संकेतस्थळावरून गायब झाले आहेत. जातीचे दाखले काढण्यासाठी अनेक प्रकारचे पुरावे, दस्तऐवज, प्रतिज्ञापत्र, अर्ज आदी देवून प्रकरण दाखल करूनही दाखले मिळाले नाहीत. त्यामुळे या सर्वांना आता पुन्हा कागदपत्र सादर करावी लागणार आहेत. शासनाने सदर दाखले पुन्हा संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांमधून होत आहे.