Breaking News

धूम स्टाईलने गंठण पळविले


राहुरी शहरातील अझीम किराणा दुकानासमोरून ज्योती राजेंद्र आकडे या महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण पल्सर या दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी धूम स्टाईलने पळविले. दि. २४ रोजी दुपारी ४ च्या दरम्यान ही घटना घडली. 
याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आकडे या दुपारी घरुन बाहेर जात असताना त्यांच्या घरासमोर अचानक पल्सर या दुचाकी वर आलेल्या दोन जणांनी त्यांच्या गळ्यातील २ तोळ्याचे गंठन तोडून नेले. शहरातील शिवाजी चौक ते शुक्लेश्वर चौकादरम्यान रस्त्यावर सतत असणारी नागरिकांची वर्दळ आणि येथे अनेक व्यावसायिकांच्या दुकाने सुरु असताना ही घटना घडली, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. राहुरी शहरात ‘चैन स्नॅचिंग’ च्या अनेक घटना आजपर्यंत घडल्या आहेत. यापैकी काही तपास लागले तर काहींचा तपास सुरु आहे. मात्र भरदुपारी ही घटना घडल्याने महिलावर्गात भितीचे वातवरण पसरले आहे. पोलिस या भामट्यांचा शोध घेत आहेत. सिशेष म्हणजे हे दुचाकीस्वार काही दुकानांसमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे बोलले जात आहे.