Breaking News

शिल्लक ऊसाचे संपूर्ण गाळप होण्याच्या दृष्टीने अशोक कारखाना प्रयत्नशील - राऊत


श्रीरामपूर , अशोक सहकारी साखर कारखान्याने माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2017-18 च्या गळीत हंगामात 31 मार्च अखेर स्वत:चे 5 लाख 50 हजार मे. टन व बाहेरील कारखान्यांना 90 हजार मे. टन ऊसाचा पुरवठा करुन एकूण 6 लाख 40 हजार मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. तसेच वीज निर्मिती प्रकल्पाद्वारे 4 कोटी 78 लाख 10 हजार युनिटस्ची वीज निर्मिती करुन महावितरण कंपनीला विक्री केलेल्या 3 कोटी 25 लाख 72 हजार युनिटस्ची महावितरण कंपनीला विक्री करुन त्याद्वारे 20 कोटी 71 लाख 57 हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. यासह डिस्टीलरी प्रकल्पाद्वारे 43 लाख 14 हजार लिटर्स अल्कोहोल आणि इथेनॉल प्रकल्पाद्वारे 3 लाख 45 हजार 580 लिटर्स इथेनॉलची निर्मिती झाली असल्याची माहिती चेअरमन सोपानराव राऊत यांनी दिली.

सन 2017-18 च्या गळीत हंगामाबाबत माहिती देताना राऊत यांनी सांगितले की, हंगाम सुरु होण्यापुर्वी कारखानाना व्यवस्थापनाने ऊस उपलब्धतेचा आढावा घेतला होता. त्यावेळी प्रती एकर 30 मे. टन नुसार 6 लाख 75 हजार मे. टन ऊस उपलब्धता गृहीत धरणेत आली होती. तथापि, मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने ऊसाच्या उत्पादनात अंदाजापेक्षा प्रती एकर सरासरी 10 मे. टनाची वाढ होवून ऊसाची उपलब्धता 9 लाख मे. टनापर्यंत गेली. कारखान्याने मागील वर्षी अशोक बँकेच्या माध्यमातून कारखाना हमीवर शेतकर्‍यांना आर्थिक उपलब्धता करुन दिल्याने नोव्हेंबर 2016 मध्ये तब्बल 10 हजार एकर ऊसाची लागवड झाली. या कारणांमुळे एकूण 9 लाख मे. टन उपलब्ध ऊसापैकी केवळ नोव्हेंबर या एकाच महिन्यात 45 टक्के म्हणजे 4 लाख 20 हजार मे. टन ऊसाची उपलब्धता निर्माण झाली. यामुळे नोव्हेंबर महिन्यातील ऊस गाळप करण्यास काहीसा विलंब होत असल्याचे ते म्हणाले.

आजमितीस कारखाना दररोज 4 हजार मे. टन स्वत:चे आणि प्रवरा, गणेश, संगमनेर, कोसाका,राहुरी, युटेक, दौंड, प्रसाद व क्रांती या 9 कारखान्यांना दररोज 3 हजार मे. टन ऊसाचा पुरवठा करुनदररोज 7 हजार मे. टन ऊसाचे गाळप करीत आहे. कार्यक्षेत्रातील ऊसाची उपलब्धता अंदाजापेक्षा वाढल्याने व्यवस्थापनाने तातडीने अतिरिक्त ऊस तोडणी मजुर आणि 20 ऊस तोडणी यंत्राची तातडीनेउपलब्धता केली. कोणत्याही परिस्थितीत शिल्लक ऊसाचे लवकरात लवकर संपूर्ण गाळप होण्याच्या दृष्टीने कारखाना व्यवस्थापन प्रयत्नशील असल्याचे श्री.राऊत यांनी सांगितले.