Breaking News

भाजपचे नगरसेवक मिलिंद काकडे यांना गट नेतेपदाची लॉटरी


सातारा, प्रभाग क्रमांक दोनचे भाजपचे नगरसेवक मिलिंद काकडे यांना अनपेक्षितपणे पालिकेच्या गटनेतेपदाची लॉटरी लागली आहे. कोल्हापूरमध्ये शासकीय विश्रामगृहात जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या निर्णयाचा नारळ फोडण्यात आला. मात्र या वृत्ताला कोणत्याच भाजप नेत्याने दुजोरा दिला नाही.

येत्या दोन दिवसात काकडे यांना गटनेतेपदाची जवाबदारी अधिकृतपणे दिली जाणार आहे. नगरसेवक धनंजय जांभळे व विजय काटवटे यांच्यात झालेल्या बाचाबाचीची गंभीर दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली होती. त्यानुसार धनंजय जांभळे यांच्या गटनेतेपदाचा राजीनामा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या थेट आदेशाने घेण्यात आला होता. त्यामुळे भाजपचा नवीन गटनेता कोण याची उत्सुकता पालिका वर्तुळाला लागली होती. भाजपच्या सहा नगरसेवकांची बैठक येथील कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहात दुपारी साडेबाराच्या दरम्यान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पाडली.
 
या बैठकीत गटनेतेपदाच्या संदर्भात चंद्रकांत यांनी जिल्हाध्यक्ष पावसकर यांच्याशी चर्चा केली. सिध्दी पवार यांनी यापूर्वीच गटनेतेपदाच्या जवाबदारीला नकार दिला होता. काटवटे व आशा पंडित यांच्यापेक्षा अचानक मिलिंद काकडे यांच्या नावाची चर्चा झाली . काकडे यांनी ही गटनेतेपदाची जवाबदारी स्वीकारण्यास तयारी दर्शवली. त्यामुळे बैठकीत मिलिंद काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. गटनेते पद स्वीकृतीचे पत्र येत्या दोन दिवसात काकडे यांना दोन दिवसात दिले जाणार आहे. काकडे यांच्याशी संपर्क साधला असता गटनेतेपदाच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र अद्याप पत्र न मिळाल्याचे स्पष्ट केले. काकडे हे खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक आहेत. सर्वसाधारण सभांमध्ये त्यांची उपस्थिती असते मात्र प्रत्यक्ष विषय मांडणीत त्यांनी कधीच भाग घेतला नाही. भाजपमध्ये काकडे असले तरी ते राजे समर्थक असल्याची च त्यांची ओळख आहे. त्यामुळे सातारा विकास आघाडीच्या विरोधाची तोफ काकडे डागणार का? हा खरा औत्सुक्याचा विषय असणार आहे.