Breaking News

येळी येथील येळेश्‍वराचा यात्रोत्सव उत्साहात


पाथर्डी ( प्रतिनिधी) - तालुक्यातील येळी गावातील येळेश्‍वराचा यात्रोत्सव पैठण येथून आणलेल्या कावडी, कलाकारांच्या हजेर्‍या , छबिना व कुस्त्यांचा जंगी हंगामा अशा पारंपारिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दरवर्षी एप्रिल महिन्यातील चैत्र पोर्णिमेच्या नंतर येळेश्‍वराचा यात्रोत्सव पार पडत असतो चालू वर्षीही येळी गावातील ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील येळेश्‍वराचे भक्त यांच्या उपस्थित सोमवारी सवाद्य मिरवणुकीत संद्याकाळी कावडीची ग्रामस्थांनी भव्य मिरवणूक काढली होती. सोमवारी येळेश्‍वर देवस्थानचे महंत रामगिरी महाराज यांच्या उपस्थितीत पंचक्रोशीतील युवकांनी पैठण येथून आणलेले कावडीच्या पाण्याने येळेश्‍वराच्या पिंडीला जलाभिषेक घालण्यात आला. मंगळवारी सकाळी गावात ठिकठिकांणाहून आलेल्या कलाकारांच्या हजेर्‍या पार पडल्या. तर सायंकाळी कुस्त्यांचा फड रंगला. जिल्ह्यातून आलेल्या मल्लांच्या कुस्त्यामध्ये महिलांच्या कुस्त्यांचा प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला. यावेळी विजेत्या मल्लांना येळेश्‍वर संस्थांनचे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. यात्रेत आलेले खेळण्या तसेच खाऊचे दुकाने तसेच दर्शनासाठी आलेले भाविक यामुळे परिसर गजबजून गेला होता. यात्रा यशस्वी पार पाडण्यासाठी महादेव जायभाय, संजय बड़े, शंकर बडे, अशोक ढोले, दत्ता बडे, भुजंग कराड, विठ्ठल शेळके, राजेंद्र जायभाय, संजय कराड यांच्यासह पंचकमिटी व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.