सामाजिक समता सप्ताहाचा आजपासून शुभारंभ
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत
बुलडाणा, दि. 08 - अनुसूचित जाती व सर्व प्रकारचे पिडीत शोषीत असलेल्यांना सामाजिक न्याय, आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करून देण्याबाबत शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्याअनुषंगाने अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगिण विकासासाठी कल्याणकारी योजना सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येतात. या कल्याणकारी योजना राबविण्याचा उद्देश साध्य होण्याच्या हेतूने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचा शुभारंभ उद्या 8 एप्रिल 2017 रोजी करण्यात येत आहे.सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांच्याहस्ते सामाजिक न्याय भवन येथे सकाळी 10 वाजता होत आहे. सप्ताहादरम्यान 9 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता सामाजिक न्याय विभागातंर्गत सर्व महामंडळामार्फत राबविण्यात येणार्या विविध योजनांची माहिती, कर्जाचे वाटप, तसेच सर्व योजनांबाबत मार्गदर्शन सामाजिक न्याय भवन येथे प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच 10 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता महाविद्यालय/निवासी शाळा, आश्रमशाळा शासकीय व अनुदानीत वसतीगृहामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील लघुनाट्य, प्रश्नमंजुषा, वादविवाद स्पर्धा आयोजीत करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे सप्ताहात 11 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांचे सहकार्यातून रक्तदान शिबिराचे आयोजन व व्यसनमूक्ती प्रसार कार्यात विविध संस्था, संघटनांचा साहाय्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 12 एप्रिल रोजी जिल्ह्यात स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 13 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता सामाजिक कार्यक्षेत्रातील विचारवंत, प्रसिद्ध व्यक्ती यांचे समाज प्रबोधनपर विविध विषयांवर व्याख्यानाचे तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नामवंत लोककलावंत यांचे विविध सामाजिक विषयावर प्रबोधनपर कार्यक्रमाचे सामाजिक न्याय भवन येथे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 14 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता सामाजिक न्याय भवन येथे या सप्ताहाची सांगता जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमाने करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त एम. जी वाठ यांनी केले आहे.