Breaking News

मेहेरझाद इराणीने गाजवले वर्चस्व; सायकल शर्यतीचे विजेतेपद


मुंबई, दि. 30, एप्रिल - मागील काही शर्यतीपासून आपल्या नावाची दखल घ्यायला लावणार्‍या मेहेरझाद इराणीने निर्विवाद वर्चस्व राखत राईप मँगो स्पोर्ट्स दादर विरार सायकल शर्यतीचे विजेतेपद मिळवले. राईप मँगो स्पोर्ट्स आयोजित या शर्यतीत मेहेरझादने तब्बल तीन मिनिटांचे अंतर राखत प्रथम स्थान मिळवले. सुमारे 82 किलोमीटर अंतराची ही शर्यत मेहेरझादने 1 तास 27 मिनिटे 44 सेकंद अशा वेळेत पूर्ण केली.

दादर-नायगाव भागातील लोकसेवा हायस्कुल येथून सुरू झालेली ही शर्यत सुरुवातीला काहीशी संथ वेगाने पुढे सरकत होती. ठाणे शहरातील घोडबंदर परिसरात आल्यावर मात्र सायकलपटूंनी आपला वेग वाढवला. मात्र त्या दरम्यानही सर्वच सायकलपटूं एकाच जथ्यात जात असल्यामुळे शर्यतीत रंग भरला. या दरम्यान नायगाव वसई पार केल्यावर मेहेरझादने मुसंडी मारत आघाडी घेतली. या दरम्यान सकाळच्या वार्‍याचा फायदा उचलत मेहेरझादने ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखत रोख 21 हजार रूपये आणि गौरवचिन्ह आपल्या नावे केला. मेहेरझाद नंतर तिघा सायकलपटूंनी एकत्रितपणे अंतिम रेषा पार केली. या खेळाच्या आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे या तिघाच्या नावे 1 तास 30 मिनीटे 48 सेकंद अशी वेळ नोंदवण्यात आली. त्यात फोटोफिनिशनुसार प्रकाश ओळेकर दुसर्‍या तर सूर्या थाठू तिसर्‍या क्रमांकाचा मानकरी ठरला. प्रकाशला 18 हजार तर सूर्याला 15 हजार रुपयांच्या रोख पुरस्काराने गौरवण्यात आले. मुंबईतील 100 हुन अधिक सायकलपटूंनी सहभाग घेतलेल्या या शर्यतीत पहिल्या दहा क्रमांकाच्या सायकलपटूंना रोख पुरस्कार देण्यात आले.