Breaking News

नगरमधील गुन्हेगारी मोडून काढणार : दीपक केसरकर

मुंबई/अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेच्या दोन पदाधिकार्‍यांच्या हत्येप्रकरणाचा तपास प्रगतीपथावर आहे. या प्रकरणातील आरोपी कितीही मोठा असला तरी कुणाचीही गय केली जाणार नाही. तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री दीपक केसरकर म्हटले आहे. ते आज मंत्रालयात नगरमधील दुहेरी हत्याकांड प्रकरणावर पत्रकारांशी बोलत होते. अहमदनगर जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या दोन पदाधिकार्‍यांची गोळ्या घालून तसेच गुप्तीने वार करून हत्या करण्यात आली होती. त्यांनतर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी याप्रकरणात अटक केली. तर त्यांचे वडील आमदार वरुण जगताप यांच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र, ते ते फरार आहेत. तसेच हत्याकाडंप्रकरणी भाजपचे आमदार आणि संग्राम जगताप यांचे सासरे शिवाजी कर्डिले यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी हत्याकांडप्रकरणी कारवाई सुरू केल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयावरही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्या प्रकरणी देखील काही संबंधितांना अटक केल्याचे केसरकर यांनी सांगितले. जिल्ह्यात गुंडांना मदत केल्याप्रकरणी काही पोलिसांवरही कारवाई सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारी कामात अडथळा आणून, पोलीस कार्यालय तोडून आपण सुटू असा समज कुणीही करू नये, असा इशारा केसरकर यांनी कर्डिले आणि जगताप यांना दिला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढली असून, गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणार्‍यांवरही प्रतिबंधात्मक कारवाई होईल. अहमदनगर जिल्ह्याचा दौरा करून सर्व गुन्हेगारांची पाळेमुळे शोधून काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या घटनेनंतर जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक होते. मात्र, त्यांना आता शिवसेनेच्या नेत्यांनी शांत केले आहे. शिवसेना आक्रमक असली तरी गुन्हेगार नाही, असेही केसरकर म्हणाले. मी सेनेत राष्ट्रवादीतून आलो आहे. गुन्हेगारीमुळेच तो पक्ष सोडल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.