Breaking News

शांततेसाठी दोन्ही देश सकारात्मक पंतप्रधान मोदी-जिनपिंग यांच्यात द्पिक्षीय संबध सुधारण्यावर भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यातील दोन दिवसीय शिखर परिषदेला शुक्रवारपासून सुरूवात झाली. यावेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दोन्ही देश शांतता, स्थैर्य, आणि समृध्दीसाठी सकारात्मक असून, महत्वाची भूमिका बजावतील. गेल्या 2000 वर्षांपैकी 1600 वर्षे भारत आणि चीनने जागतिक आर्थिक वृद्धीसाठी एखाद्या इंजिनाप्रमाणे काम केले आहे, असेही मोदी म्हणाले. मोदींच्या म्हणण्याला शी जिनपिंग यांनीही प्रतिसाद दिला. जागतिक विकास आणि शांततेसाठी भारत आणि चीन या देशांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. अशाप्रकारच्या अनौपचारिक बैठकांच्या माध्यमातून हा मैत्रीचा धागा अधिक घट्ट होत गेला पाहिजे, असे शी जिनपिंग म्हणाले. 

शी जिनपींग यांनी पारंपरिक प्रथेला फाटा देत राजधानी बीजिंग बाहेर अशी शिखर परिषद आयोजित केल्यानं त्याला महत्व प्राप्त झाले आहे. पंतप्रधानांचे औपचारिक स्वागत झाल्यानंतर मोदी आणि जिनपींग यांनी तिथल्या संग्रहालयाची पाहणी करत चर्चा केली. नंतर ईस्ट लेक गेस्ट हाऊसमध्ये दोनही नेत्यांच्या चर्चेच्या पहिल्या फेरीला सुरवात झाली. यावेळी त्यांच्यासोबत फक्त अनुवादकच उपस्थित होते. दोन दिवसांच्या या शिखर परिषदला कुठलाही नेमका अजेंडा नसल्याने या चर्चेत महत्वाच्या आणि वादाच्या सर्वच प्रश्‍नांवर मोकळी चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मोदींचा गेल्या 4 वर्षातील हा चौथा चीन दौरा असून मोदी आणि जिनपिंग यांची ही 11 वी भेट ठरली. 
लष्करी आणि व्यापारी दृष्टीने भारताला कमी लेखने शक्य नाही याची चीनला जाणीव आहे. त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनकडून होणारी आयात कमी करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा फटका चीनला बसू शकतो. अशा पार्श्‍वभूमीवर दोन्ही देशांमधली ही चर्चा अतिशय महत्वाची समजली जाते. या आधी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि अध्यक्ष तंग श्योपींग यांची 1988 मध्ये अशीच बैठक झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांदरम्यानचा तणावही कमी झाला होता. 1965 च्या युद्धानंतर निर्माण झालेली कटुता कमी क रण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आता 30 वर्षानंतर पुन्हा तशीच भेट होत आहे. पाकिस्तानी दहशतवादी मसूद अझर याच्यावर बंदी घालण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीनने केलेला विरोध, भारताच्या ‘एनएसजी’ सदस्यत्वालाही चीनने केलेला विरोध आणि भारतानेही पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या सहकार्याने सुरू असलेल्या चीनच्या प्रकल्पाला केलेला विरोध आदी मुद्दयांवरही दोन्ही नेत्यांमध्ये दुसर्‍या दिवशी चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र त्याबाबत मोदी आणि जिनपिंग या दोघांकडूनही कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.